प्रदूषण पातळी घटणार

मुंबईमध्ये शुक्रवारी हवेची प्रतवारी आधीच्या दोन दिवसांपेक्षा चांगली होती. ‘सफर’ या प्रदूषणमापकानुसार मुंबईच्या दिवसभरातील हवेच्या प्रतवारीचा निर्देशांक १७८.८ इतका नोंदवला गेला आहे. पुढील तीन दिवसांत यात आणखी घट होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ाभरात तापमापकाच्या पाऱ्यामध्ये चढउतार अनुभवणाऱ्या मुंबईकरांना शुक्रवारी पुन्हा एकदा वातावरणात गारवा अनुभवायला मिळाला. सांताक्रूझ येथे गुरुवारी नोंदल्या गेलेल्या तापमानात घट होऊन शुक्रवारी किमान १८.८ अंश सेल्सिअस व कमाल ३२.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई व परिसरात येत्या दोन दिवसांत गारवा कायम राहणार असल्याचे वेधशाळेतर्फे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले आहे.

पुढील दोन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ होण्याची शक्यता असून आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. तर मुंबई व आसपासच्या भागात रविवापर्यंत अंशत: ढगाळ वातावरण कायम राहणार असून किमान १५ अंश सेल्सिअस व  कमाल ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊ शकते. तसेच मुंबई व उत्तर कोकणच्या काही भागात दिवस व रात्रीच्या तापमानात एक ते दोन अंश से.ने घट होणार असल्याने पुढील दोन दिवस या भागात थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

दरम्यान, राज्यात जळगाव येथे दिवसभरातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून ते ११ अंश सेल्सिअस इतके होते. राज्याच्या इतर भागात तापमान किमान १५ अंश सेल्सिअस व कमाल ३२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले असून मराठवाडय़ाच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

राज्याच्या इतर भागात वातावरण कोरडे राहिले असून राज्यभरात काल किमान तापमानात सतत बदल होत राहिल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader