सदोष कार्यपद्धतीबाबत नाराजी
शाळाबाह्य़ मुलांकरिता नव्याने होणाऱ्या सर्वेक्षणातील त्रुटी दाखवून दिल्यानंतरही शालेय शिक्षण विभागाने त्याची दखल न घेता सदोष पद्धतीने सर्वेक्षण सुरूच ठेवल्याने आता नाराज स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेतून माघार घेण्यास सुरुवात केली आहेत.
पहिली मोहीम फसल्याने शाळाबाह्य़ मुलांकरिता दुसऱ्यांदा शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र या मोहिमेच्या आखणीत राहून गेलेले कच्चे दुवे दूर केल्याशिवाय ही मोहीम अर्थपूर्ण ठरणार नाही, अशी भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती. ती दूर करण्याची मागणी गेले काही दिवस सातत्याने करण्यात येत होती; परंतु त्याकडे लक्ष दिले न गेल्याने स्वयंसेवी संस्था आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यात सर्वेक्षणादरम्यान समन्वय साधण्याचे काम करणाऱ्या शिक्षण हक्क कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. त्या पाठोपाठ काही संस्थांनीही या सर्वेक्षणातून माघार घेतली आहे. नागपूरच्या ‘संघर्ष वाहिनी-भटके विमुक्त संघर्ष वाहिनी’चे दीनानाथ वाघमारे यांनीही आपल्या मोहिमेमधील सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
या मोहिमेकरिता स्वयंसेवी संस्था आणि एनएसएमच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली आहे.
मात्र, शाळाबाह्य़ मुलांना कसे शोधायला हवे यासाठी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे; परंतु ते न देताच ही मोहीम राबविण्यात येत असल्याने त्यात उणिवा राहिल्याची तक्रार कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यासंदर्भात प्रथम, स्वप्नभूमी, अवनी, संघर्ष वाहिनी, शांतिवन, आरटीई फोरम आदी शाळाबाह्य़ मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री तावडे यांना पत्रही लिहिले होते.

Story img Loader