मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या हस्तक राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) निशाण्यावर आले असून एनआयएने इब्राहिमवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. दाऊदचा विश्वासू असलेला कुख्यात गुंड छोटा शकीलवर २० लाखांचे बक्षीस एनआयएने जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिम गँगमधील इतर सदस्यांवरही बक्षीस जाहीर केले असून त्यात मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी स्फोटातील मुख्य आरोपी टायगर मेमन, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम आणि जावेद चिकना यांचा समावेश आहे. या तिघांवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दाऊद इब्राहिम भारतात शस्त्रे, स्फोटके, अंमलीपदार्थआणि बनावट भारतीय नोटांची तस्करी करण्यामध्ये सक्रिय असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती, तसेच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि काही दहशतवादी संघटनाही त्याला यात मदत करत असल्याची माहिती देखील उघड झाली होती. यामुळे एनआयए सतर्क झाली असून याप्रकरणी एनआयएने नुकताच या सर्वप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारावर या सर्वांवर बक्षीस जाहीर केले आहे.
दाऊदच्या टोळीतील एक गट हा पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणा आयएसआय आणि इतर दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने भारतात दहशतवादी कारवाया करणे हा आहे. त्याेच संबंध लष्कर ए तैयब्बा, जैश ए मोहम्मद आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना आणि स्लीपर सेललाही मदत करत असल्याची उघड झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर एनआयएने २९ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात मुंबई, मिरा भाईंदर परिसरांचा समावेश आहे.
दाऊद टोळीच्या संबंधावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नुकतेच सलीम फ्रुट याला अटक केले. सलीम याने बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्यासाठी आणि जागेचा मालकी हक्क मिळविण्यासाठी दाऊद टोळीतील छोटा शकीलच्या नावाचा वापर केल्याचा संशय आहे. एनआयएच्या तपासात सलीम फ्रुटने किमान दोन मालमत्तांबाबत दाऊद टोळीकडून धमकावण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच अनेक बांधकाम व्यवसायिकांना धमकावून कोट्यावधी रुपये खंडणी म्हणून वसूल करण्यात आली आहे. त्यातील रक्कम पाकिस्तानातील छोटा शकील व दाऊदपर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.