कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकीलचा नातेवाईक सलीम कुरेशीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. मुंबईत ही अटकेची कारवाई करण्यात आली. सलीम कुरेशी याला सलीम फ्रूट नावानेही ओळखलं जातं. मे महिन्यात एनआयएने दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्यांविरोधात कारवाई करत मुंबई आणि ठाण्यात २० ठिकाणी छापे टाकले होते. यावेळी सलीम कुरेशीला ताब्यात घेण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली होती.
विश्लेषण: NIA ने ताब्यात घेतलेला सलीम फ्रूट नेमका कोण आहे? दाऊदशी काय संबंध?
एनआयएने दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये नोंद आहे त्यानुसार, दाऊद इब्राहिमने भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यासाठी तसंच हल्ले करण्यासाठी पाकिस्तानमध्ये एक विशेष पथक तयार केलं होतं. या पथकाचं काम भारतातील राजकीय नेत्यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर हल्ला करण्याचं होतं.
पाकिस्तानात बसून भारतामध्ये दंगली घडवण्याचा दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचा कट होता अशीही एफआयआरमध्ये नोंद आहे.
सलीम फ्रूट कोण आहे ?
सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट हा गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा आहे. दक्षिण मुंबईत कुटुंबाचा फळं विकण्याचा व्यवसाय असल्याने त्याला सलीम फ्रूट नावाने ओळखलं जातं. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी म्हणूनही त्याची ओळख आहे. छोटा शकील हा एक कुख्यात गँगस्टर आहे. तो पैसे घेऊन लोकांना मारण्याची सुपारी घेण्याचं काम आपल्या टोळीच्या माध्यमातून चालवत असे. त्याच्यावर खंडणीखोरीचे अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. छोटा शकील दाऊद इब्राहिमसाठी पाकिस्तानमधून काम करतो. सूत्रांच्या माहितीनुसार, सलीम फ्रूट तीन ते चार वेळा पाकिस्तानमध्ये छोटा शकीलच्या घरी गेला होता.
सलीम फ्रूटची याआधी इतर यंत्रणेकडून चौकशी झाली आहे का?
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणी तपासादरम्यान ईडीने सलीम फ्रूटची अनेकदा चौकशी केली.
ईडीला दिलेल्या जबाबात सलीम फ्रूटने आपण दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा जवळचा सहकारी असल्याचं सांगितंल होतं. अनेक वादग्रस्त भूखंडांच्या व्यवहारांमध्ये मध्यस्थी करून त्यातून पैसे उकळण्याचा व्यवहार हसीना पारकर चालवत असल्याचा दावा केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर देखील हसीना पारकरच्या चालकासोबत संगनमत करून कुर्ल्यातील भूखंड हडप केल्याचा आरोप आहे.