मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयेकडून सुरू असून, यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनआयएकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांची शनिवारी सकाळपासून एनआयएकडून चौकशी सुरू होती. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर वाझे यांना अटक करण्यात आली असून, त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप एनआयएने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी नवीन वळण मिळालं आहे.

सत्र न्यायालयाने फेटाळलेली अंतरिम अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर वाझे यांच्यावर एनआयएने कारवाई केली आहे. शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी केली. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कार मनसुख यांच्या ताब्यात होती. त्यामुळे मनसुख यांची हत्या आणि त्यांच्या कारची चोरी ही प्रकरणे एकाच गुन्ह्याचे पैलू असल्याने एनआयएने दोन दिवसांपूर्वी हिरेन कुटुंबाकडून माहिती घेतली. शनिवारी कुटुंबाला समोर ठेवत वाझे यांच्याकडे चौकशी केल्याची केली. तब्बल १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली.

अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यांच्या कोठडीची मागणी एनआयकडून केली जाणार आहे.

व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथक अटक करू शकेल, अशी शक्यता असल्याने वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती. मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत एटीएसने या अर्जास विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर वाझेंचा एनआयएने जबाब नोंदवला होता.

चोरीचा बनाव?

मनसुख घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मुखपट्टी होती. मात्र त्यांचा मृतदेह सापडला तेव्हा चेहऱ्यावर न वापरलेल्या पाच ते सहा रुमालांच्या घड्या होत्या. त्यांचे मनगटी घड्याळ, पुष्कराज खड्याची अंगठी, पैशांचे पाकीट, डेबीट-क्रेडिट कार्ड, पैसे आणि मोबाइल यापैकी एकही वस्तू मृतदेहासोबत नव्हती. या सर्व वस्तू गायब करून चोरीच्या उद्देशाने मनसुख यांची हत्या करण्यात आली, असा बनाव रचण्यात आल्याचा संशय तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी व्यक्त करतात.

Story img Loader