मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संबंधित २१ व्यक्तींच्या २९ ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) सोमवारी सकाळी छापे टाकले. त्यात मुंबईतील २४ व मीरा भाईंदर परिसरातील ५ ठिकाणांचा समावेश आहे. यामध्ये काही तस्कर, बांधकाम व्यवसायिकांच्या संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. कारवाईत इलेक्ट्रॉनिक वस्तू, गुंतवणुकीबाबतची कागदपत्रे, रोख रक्कम व शस्त्र जप्त करण्यात आली.

‘एनआयए’ने फेब्रवारी महिन्यात दाऊद इब्राहिम व हाजी अनीस ऊर्फ अनीस इब्राहिम शेख, शकील शेख ऊर्फ छोटा शकील, जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन ऊर्फ टागर मेमन व त्यांच्या साथीदारांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांसंबंधित गुन्हा दाखल केला होता. ही टोळी शस्त्रास्त्रांची तस्करी, अमली पदार्थ, आर्थिक गैरव्यवहार, बनावट नोटांच्या वितरणशी संबंधित आहे. टोळी ‘लष्कर ए तैयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’  आणि ‘अल कायदा’ यासारख्या संघटनांबरोबर दहशवादासाठी निधी उभारण्याचे काम करीत असल्याचा आरोप आहे. त्याबाबत ‘एनआयए’कडून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात ही छापे टाकण्यात आले होते. खंडणी वसुलीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर देशविरोधी कारवायांमध्ये होत असल्याचा आरोप आहे. ‘एनआयए’ने याप्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. संयुक्त राष्ट्रांनी २००३ मध्ये दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. 

खंडवानी, सलीम फ्रुट यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही समावेश

एनआयएने याप्रकरणी माहीम आणि हाजी अली दग्याचे विश्वस्त सुहैल खंडवानी यांच्या माहीम, छोटा शकिलचा साडू सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट याच्या भेंडीबाजार येथील ठिकाणांवर शोध मोहीम राबवली. सुहैल खंडवानी बांधकाम व्यवसायिक कंपनीचे संचालक आहेत. यावेळी एनआयएने सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले. सलीम याच्या घरी आणि इतर ठिकाणीही छापे टाकले. याशिवाय बांधकाम व्यवसायिक व बुकी यांचीही एनआयएने चौकशी केली. माहीम व वांद्रे येथेही अनेकांची चौकशी करण्यात आली.

Story img Loader