मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संबंधित प्रकरणांमध्ये राष्ट्रीय तपास पथकाने बुधवारी मुंबई, ठाण्यासह देशभरातील २० ठिकाणी छापे घातले. महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये ‘एनआयए’ने कारवाई केली. विक्रोळीतील अब्दुल वाहिद शेख याच्या घरी ‘एनआयए’ने पहाटे छापा घातला. शेखने घराचा दरवाजा न उघडल्यामुळे ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना सहा तास घराबाहेरच प्रतीक्षा करावी लागली. अखेर ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी शेखच्या घरात दाखल होऊन चौकशी केली. यावेळी स्थानिक पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई: आंतरराष्ट्रीय कंपनीची १६ कोटी रुपयांची फसवणूक; कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

शेख एक संस्था चालवतो. त्याचा ‘पीएफआय’शी संबंध असल्याचा संशय आहे. ‘एनआयए’ने मुंबई आणि ठाणे अशा दोन ठिकाणी छापे घातले. विक्रोळी येथील अब्दुल वाहिद शेखच्या विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील निवासस्थाना व्यतिरिक्त, ‘एनआयए’च्या पथकाने भिवंडी, मुंब्रा आणि महाराष्ट्रातील इतर विविध जिल्ह्यांमध्येही शोध मोहीम राबवली. ‘पीएफआय’वर देशभरात कारवाई करण्यात आल्यानंतर नव्या नावाने आणि नव्या सदस्यांसह ‘पीएफआय’ची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे. नवीन नावाने स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेचे कार्य सुरू असून, त्यासाठी गुप्तपणे निधीही जमा केला जात असल्याचा संशय आहे. या माहितीच्या आधारावर अनेक संशयितांची चौकशीही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आपल्याला कोणतीही कागदपत्रे दाखवण्यात आलेली नसल्याचा आरोप शेखने समाजमाध्यमांवर एक चित्रफीत प्रसारित करून केला. याप्रकरणी स्थानिक पोलीस आणि आयुक्तांकडे तक्रार केल्याचेही शेखने म्हटले आहे. ७/११ च्या रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणात शेख संशयित होता. परंतु, न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. ११ जुलै २००६ ला मुंबईतील लोकलमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात १८७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. अनेकजण जखमी झाले होते. दुसरा छापा ठाण्यातील राबोडी परिसरात टाकण्यात आला. सिमी या प्रतिबंधित संघटनेच्या माजी सदस्याच्या घरी हा छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी एनआयएने संशयिताच्या घरी शोध मोहीम राबवली. त्याला ‘एनआयए’च्या लखनऊ येथील कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आपला ‘पीएफआय’ संघटनेशी कोणताही संबंध नसल्याचे त्याने चौकशीत सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia raids over 20 locations across country in case link with pfi zws