इसिस संघटनेतून भारतात परतलेल्या आरिफ माजिद या तरुणाला अत्याधुनिक शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण मिळाले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे मुंबईत परतलेल्या आरिफला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती. त्याला शनिवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले असता ८ डिसेंबर पर्यंत ‘एनआयए कोठडी’ ठोठावण्यात आली आहे.  
मे महिन्यात मध्य पूर्व आशियाई देशात एका गटाबरोबर धार्मिक सहलीसाठी गेलेल्या कल्याणमधील चार तरुणांपैकी आरिफ माजिद एक होता. मात्र तेथून हे चार तरू ण बेपत्ता झाले आणि ‘इसिस’च्या संपर्कात आले. सुशिक्षित घरातील आरिफ धर्मवेडा झाला होता. ऑनलाइन पद्धतीने जिहादबाबत माहिती मिळवत होता. ‘इसिस’च्या सिरिया सरकारविरुद्धच्या संघर्षांवेळी तेथून तो तुर्कीत पसार झाला होता. गुप्तचर यंत्रणेच्या विशेष ऑपरेशननंतर त्याला शुक्रवारी भारतात आणण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली होती. आरिफलला १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. तेथे त्याला अत्याधुनिक शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले गेल्याची बाब चौकशीत समोर आली आहे. आरिफची कसून चौकशी सुरू असून सध्या तरी तो अनेक परस्परविरोधी वक्तव्य करत आहे. इराकमध्ये गेल्याचा आपल्याला अजिबात पश्चाताप होत नसल्याचे त्याने सांगितले, त्याचवेळी इसिससाठी उपयुक्त ठरता न आल्याचेही तो सांगतो, असे सूत्रांनी सांगितले. त्याच्या तिन्ही मित्रांना फरार घोषित करण्यात आले आहे. आरिफलाला न्यायालयाने ८ डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत पाठवले आहे.

Story img Loader