मुंबई : दादर आणि विद्याविहार येथे भररस्त्यात महिलांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांपाठोपाठ गुरुवारी शिवडी येथे एका महिलेवर मद्यपीने चाकूहल्ला केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, हा प्रकार पाहणाऱ्यांपैकी एकानेही या मद्यपीला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. सुदैवाने गस्तीवर असलेले पोलीस तेथे पोहोचल्याने त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळून महिलेचे प्राण वाचवले.
शिवडी बसस्थानकानजीकच्या आझाद नगर येथे गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीती जैस्वाल (३५) ही महिला आपल्या पतीबरोबर मुलांना शिकवणीहून आणण्यासाठी निघाली होती. त्या इमारतीत राहणारा विलास चोरघे (३२) हा आरोपी या महिलेच्या स्कुटीवर मद्यपान करत बसला होता. प्रीतीच्या पतीने हटकल्यावर दोघांत भांडण झाले. पतीने मद्यपी चोरघेच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतप्त झालेल्या चोरघेने चाकू ने प्रीतीवर वार केले. तिला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी बघ्यांची भूमिका घेतली. मात्र, नेमक्या त्याच वेळेस पोलिसांचे गस्ती वाहने तेथून जात होते. त्यांनी ताबडतोब चोरघेला पकडले.हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.     

Story img Loader