नाहूर – मुलुंडदरम्यानच्या उड्डाणपुलावर गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेने ७ एप्रिल रोजी मध्यरात्री पाचवी – सहावी मार्गिका आणि विक्रोळी – मुलुंडदरम्यान दोन्ही जलद मार्गांवर मेगाब्लाॅक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथून कर्जतसाठी शेवटची लोकल मध्यरात्री १२.२४ वाजता सोडण्यात येणार आहे. त्यानंतर मध्यरात्री १२.२८ ची सीएसएमटी-ठाणे आणि १२.३१ ची सीएसएमटी-कुर्ला लोकल रद्द करण्यात आली असून या दिवशी मध्यरात्री कर्जत लोकलनंतर कोणतीही लोकल धावणार नाही.
शनिवारी मध्यरात्री १.२० ते रविवारी पहाटे ४.२० वाजेपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गावर, तर शनिवारी मध्यरात्री १.२० ते पहाटे सव्वापाचपर्यंत विक्रोळी – मुलुंडदरम्यान दोन्ही जलद मार्गांवर मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे रविवारी पहाटे ४.४७ वाजता सीएसएमटी येथून कर्जतसाठी पहिली लोकल सोडण्यात येणार आहे. तर रविवारी पहाटे ४.४८ वाजता कल्याण येथून सीएसएमटीसाठी पहिली लोकल सुटेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा- मुंबई महानगरपालिकेची ८ जानेवारी रोजी बाल चित्रकला स्पर्धा
गाडी क्रमांक ११०२० कोणार्क एक्स्प्रेसला ठाणे स्थानकात आणि गाडी क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. सीएसएमटीपर्यंत या गाड्या येणार नसल्याने प्रवाशांना लोकलने पुढील प्रवास करावा लागणार आहे. तर गाडी क्रमांक १८०३० शालिमार एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १८५१९ विशाखापट्ट्णम-एलटीटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१३४ मंगलोर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २०१०४ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस ४० ते ६५ मिनिटे विलंबाने धावतील.