नारायण राणे साहेबांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या इच्छेनुसार गुहागर मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतल्याचे काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
माझा लढा कोणत्याही पक्षाविरोधात नव्हता, हा लढा व्यक्तीविरोधात होता त्यामुळे गुहागर मतदार संघात भास्कर जाधव यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला होता परंतु, राणेसाहेबांवर आता मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या इच्छेखातर स्वत:चा निर्णय मागे घेतला मात्र, गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या पराभवासाठी माझी सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचे सुतोवाचही निलेश राणेंनी केले. तसेच गुहागरमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या बड्यानेत्यांनी दुरध्वनीवरून संपर्क साधून पाठिंबा दर्शविला होता असा गौप्यस्फोटही निलेश राणेंनी यावेळी केला. यापुढे गुहागर आणि भाऊ नितेश राणे इच्छुक असलेल्या कणकवली मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठीचे काम करत राहणार असल्याचेही ते म्हणाले.
आगामी निवडणुकीत आपण भास्कर जाधव यांची पैशाची मस्ती उतरवून दाखवू, अशी तोफ डागत निलेश राणे यांनी गुहागर मतदार संघात जाधवांविरोधात निवडणूक लढणार असल्याचे मागील आठवड्यात जाहीर केले होते. तसेच गुहागर मतदारसंघातून लढण्याचा निर्णय आपण स्वतंत्रपणे घेतला असून, नारायण राणे यांना या निर्णयाबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.