भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांना हिंदू धर्म स्विकारायला लावल्यास, सिडनीसारख्या दहशतवादी घटना टाळता येतील, अशी मुक्ताफळे काँग्रेस नेते निलेश राणे यांनी ट्विटरवरून उधळली. सिडनीत सोमवारी एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून कॅफेतील काही लोकांना ओलीस धरले होते. याविषयी भाष्य करताना, जगात सिडनीसारख्या घटना थोड्याफार फरकाने सर्वत्रच घडतात. भारताला हे टाळायचे असेल, तर जास्तीत जास्त लोकांचे हिंदुंमध्ये धर्मांतर करण्यावर भर दिला पाहिजे, असे निलेश राणेंनी ट्विटरवर म्हटले.
याविषयी विचारले असता त्यांनी सध्या उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या सामूहिक धर्मांतराचे समर्थन केले. मी काँग्रेस किंवा भाजप यांपैकी कोणाचीही कास धरू इच्छित नाही. मात्र, सर्व हिंदू एकत्र उभे राहिल्यास अशा घटना नक्कीच टाळता येतील. बंदुकीच्या जोरावर धर्मांतर होण्यापेक्षा सध्या उत्तर प्रदेशात लोक ज्याप्रकारे हिंदू धर्मात प्रवेश करत आहेत, त्यामध्ये मला काहीही चुकीचे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाचा सामना करण्यासाठी हिंदू धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा सक्षम आहे. मात्र, हे माझे वैयक्तिक मत असून, पक्षाचा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
या ट्विटच्या तासभरानंतरच निलेश यांनी ‘तालिबानला संपवा. ती वेळ आली आहे’ असे सांगत पेशावरच्या लष्करी शाळेवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा