मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथून बुधवारी दुपारच्या सुमारास ‘नीलकमल’ प्रवासी बोटीतून घारापुरीला निघालेले प्रवासी नौदलाच्या स्पीड बोटीचा थरार ‘याचि देही याचि डोळा’ पाहात होते. भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेणारी स्पीड बोट मोबाइलच्या कॅमेऱ्यात बंदीस्त करण्याचा मोह अनेक प्रवाशांना आवरता आला नाही. मात्र हा थरार क्षणातच जीवघेणा बनला. नौदलाची स्पीड बोट ‘नीलकमल’वर आदळली आणि क्षणभरातच होत्याचे नव्हते झाले. एकच हाहाकार उडाला. अथांग सागरात मदतीसाठी कुणी धाऊन येते का याकडे सर्वांचेच डोळे लागले होते. यापैकी काही प्रवाशांनी कटु अनुभवांना ‘लोकसत्ता’कडे वाट मोकळी केली.

मुंबईत राहणारे गौतम गुप्ता गाझीपूरहून आलेली आई रामजी देवी आणि बहीण रिता यांना एलिफंटा लेणी दाखवण्यासाठी ‘नीलकमल’मधून घारापुरीला जात होते. जहाजाच्या वरच्या भागात बसलेले गौतम भ्रमणध्वनीवरील कॅमेऱ्यात आजूबाजूची दृश्ये टिपण्यात दंग होते. त्याच वेळी उपघात झाला. ‘आमची बोट मार्गस्थ होत असताना समोरून एक स्पीड बोट वेगाने आमच्या दिशेला येत होती. या स्पीड बोटीने ‘नीलकमल’भोवती तीन फेऱ्या मारल्या आणि त्यानंतर ती आमच्या बोटीवर धडकली. मी, रिंता आणि आई पाण्यात पडलो. मात्र, मला आणि रिताला अन्य बोटीवरील प्रवाशांनी वाचवले. आई कुठे आहे याची माहिती मिळाली नाही, असे गौतम यांनी सांगितले.

हेही वाचा – नीलकमल बोट अपघात : प्रवासी बोटीवरील लहान मुलासह दोघेजण अद्याप बेपत्ता, नौदल, तटरक्षक दलाकडून शोध सुरू

u

आई-बाबांच्या भेटीची आस

मालाड येथे वास्तव्यास असलेल्या संतोषीदेवी आणि अन्साराम भाटी दाम्पत्य मुलगा तरुणला सोबत घेऊन घारापुरी लेणी पाहण्यासाठी बुधवारी गेट वे ऑफ इंडियाला आले होते. घारापुरीच्या बोटीत बसून ते निघाले आणि त्यांच्या बोटीचा अपघात झाला. अपघात होताच गोंधळ उडाला. मात्र या गोंधळातच मिळालेले लाईफ जॅकेट घातल्यामुळे तरूण वाचला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आई-वडिलांचा पत्ता लागत नसल्याने तो बेचैन झाला होता.

मनात धडकी

‘मी दुसऱ्यांदा एलिफंटा लेणी पाहण्यासाठी आलो होतो, मात्र अपघातामुळे माझ्या मनात धडकी भरली आहे. मी भविष्यात कधीही या प्रवासी बोटीतून प्रवास करणार नाही,’ अशी प्रतिक्रिया या अपघातामुळे धास्तावलेल्या बी. अनिल कुमार यांनी व्यक्त केली. बी. अनिल कुमार (३५) आणि अशोक नारकप्पा (४८) हे दोघेही तेलंगणावरून मुंबईत कामानिमित्ताने आले होते.

हेही वाचा – मुंबईबाहेर रुजू न झाल्याने १५ पोलिसांना कार्यमुक्त करण्यास नकार, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी

चौधरी बंधू बचावले…

कुर्ला येथे कार्यालयातील खुर्ची बनविण्याचे काम करणारे नाथाराम चौधरी गावावरून आलेले भाऊ सर्वांथा आणि जितूला घारापुरी लेणी दाखविण्यासाठी आले होते. घारापुरी जवळ येताच एका स्पीड बोटीने त्यांच्या बोटीला धडक दिली. बोटीच्या वरच्या भागात बसलेल्या या तिघांनी जीवरक्षक जॅकेट घालून पाण्यात उडी मारली. दुसऱ्या बोटीवरील प्रवाशांनी आपल्याला वाचवले, असे नाथाराम यांनी सांगितले. नाथाराम आणि जितूवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करण्यात आले.

‘चालक वेगात होता’

बंगळुरूहून मुंबईला फिरण्यासाठी आलेले राम मिलन सिंग, किरण एल. ई. आणि त्यांचे दोन सहकारी घारापुरी लेणी पाहण्यासाठी गेले होते. राम मिलन सिंग आणि किरण अपघातातून सुदैवाने वाचले. मात्र त्यांच्याबरोबरच्या दोन सहकाऱ्यांविषयी कोणतीही माहिती न मिळाल्याने ते घाबरले होते. प्रवासी बोटीचा चालक फारच वेगाने बोट चालवत होता, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader