मुंबईः ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या ‘स्पीड बोट’ने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे १३ जणांच्या मृत्यूला कारभूत ठरल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नौदल, तटरक्षक दल व मुंबई पोलिसांनी राबवलेल्या बचाव कार्यात ११५ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अद्याप दोघे बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका स्पीड बोटीने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोट कलंडली आणि बुडू लागली. अपघातात वाचलेले नाथाराम चौधरी (२२) यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१)), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३) (५) अंतर्गत गुन्हा नोंदविला.

हेही वाचा – १३ जणांचा जीव घेणाऱ्या फेरी बोट अपघातामागचं कारण काय? मुंबईच्या समुद्रात घडली भीषण दुर्घटना!

दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचारी असे एकूण ११५ जणांना बचाव कार्यात वाचवण्यात आले. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ९७ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. जखमींपैकी जेएनपीटी रुग्णालयात ७५, नेव्हल डॉकयार्डमध्ये २५, अश्विनी रुग्णालयात एक, सेंट जॉर्जमध्ये नऊ, करंजे येथे १२, तर मोरा रुग्णालयात १० जणांना दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबई : प्रवासी बोटीवर सुविधांचा अभाव

नीलकमल बोटीवरील पाच कर्मचारी सुखरुप असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असून पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. अपघाताची चित्रफीतही समाजमाध्यमांवर प्रसारित झाली असून त्याची पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilkmal passenger boat case crime case against navy speedboat driver mumbai print news ssb