२००६ सालच्या मालेगाव स्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या नऊ मुस्लिम तरूणांना खटल्यातून दोषमुक्त करण्यास आपली काहीही हरकत नसल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एनआयए) गुरुवारी विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. अर्थात त्यांना दोषमुक्त करायचे की नाही याचा अंतिम निर्णय न्यायालयावर अवलंबून असेल, असेही ‘एनआयए’ने स्पष्ट केले आहे.
या नऊ आरोपींना राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. मात्र ‘समझौता एक्स्प्रेस’ स्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद याने दिलेल्या कबुलीजबाबात या स्फोटामागे हिंदुत्ववादी गटाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या आरोपींना ‘एनआयए’ने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जालाही ‘एनआयए’ने विरोध न दर्शविल्याने न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. नंतर या आरोपींनी खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर उत्तर दाखल करते वेळी आपली त्यांना खटल्यातून दोषमुक्त करण्यास हरकत नसल्याचे ‘एनआयए’ने न्यायालयाला सांगितले. या प्रकरणी आपण केलेल्या आणि ‘एटीएस’, तसेच सीबीआयने केलेल्या चौकशीत तफावत असल्याचे ‘एनआयए’ने उत्तरादाखल न्यायालयाला सांगितले. या आरोपींविरुद्ध कुठलाही ठोस पुरावा आपल्या चौकशीत आढळून आलेला नसल्याचेही ‘एनआयए’ने नमूद करीत नऊ आरोपींना दोषमुक्त करण्याचा निर्णय न्यायालयावर अवलंबून असेल, असेही स्पष्ट केले आहे.
मालेगाव स्फोटातील नऊही आरोपींविरोधात पुरावा नाही
२००६ सालच्या मालेगाव स्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या नऊ मुस्लिम तरूणांना खटल्यातून दोषमुक्त करण्यास ...
First published on: 30-08-2013 at 01:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine accused in 2006 malegaon blasts case set to walk free