कांदिवलीतील दामू नगर भागामध्ये एरंडेलाच्या बिया खाल्ल्यामुळे मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास नऊ मुलांची प्रकृती अचानक बिघडली. या सर्व मुलांना कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी चार मुलांची प्रकृती गंभीर आहे. पाच मुलांची प्रकृती स्थिर असून, मुलांवर उपचार सुरू आहेत.

कांदिवली पूर्व येथील दामू नगरमधील ४ ते ६ वर्षे वयोगटातील काही मुले मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास परिसरात खेळत होती. त्यावेळी या लहान मुलांंनी एरंडेलच्या बिया खाल्ल्या. त्यानंतर काही वेळातच या सर्व मुलांना उलट्या होऊन त्यांची तब्येत बिघडली. या मुलांना दुपारी ३ च्या सुमारास कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आपत्कालीन विभागामध्ये तातडीने उपचार करण्यात आले. एरंडेलच्या बिया खाल्यामुळे प्रकृती बिघडलेल्या नऊ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चार मुले जीवन रक्षक प्रणालीवर असून अन्य पाच मुलांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या मुलांवर उपचार करण्यात येत आहेत, असे शताब्दी रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Story img Loader