|| वीरेंद्र तळेगावकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका कारणीभूत झाल्याचा प्रवर्तकांचा दावा

‘नॉनस्टिक’ तवे आणि भांडय़ांसाठी प्रसिद्ध ‘निर्लेप’ला दोन वर्षांपूर्वीची नोटाबंदी आणि वर्षपूर्ती करीत असलेल्या ‘जीएसटी’मुळे बसलेल्या कथित आर्थिक फटक्यापासून मात्र निर्लिप्त होता आले नाही! त्यामुळेच ही कंपनी ८० कोटी रुपयांना ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ला विकण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘निर्लेप’च्या विक्रीचा कटू निर्णय नेमका कंपनीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांतच प्रवर्तकांना घ्यावा लागला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे उत्पादन प्रकल्प असलेली ‘निर्लेप अल्पायन्सेस’ ही कंपनी  बजाज इलेक्ट्रिकल्सने ८० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. १९६८ची स्थापना व १०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या निर्लेपमध्ये सध्या ५०० कर्मचारी आहेत. कंपनीवरील ३० कोटी रुपये कर्ज, काही थकीत रक्कम व कंपनीचे ४२.५० कोटी रुपयांचे मूल्य असे मिळून ८० कोटी रुपयांच्या घरातील हा व्यवहार बजाज इलेक्ट्रिकल्स येत्या सहा महिन्यांत पूर्ण करणार आहे. ‘निर्लेप अप्लायन्सेस’ गुंतवणूकदारांच्या शोधार्थ गेल्या दशकभरापासून होती. या दरम्यान कंपनीकडे काही विदेशी गुंतवणूकदारही आकृष्ट झाले. मात्र शक्यतो भारतीय व्यावसायिकाला प्राधान्य देण्याच्या इच्छेने हा निर्णय आम्ही लांबणीवर टाकत होतो. मात्र गेल्या दोन वर्षांत नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ (वस्तू व सेवा कर) यामुळे इच्छा असूनही व्यवसाय करणे कठीण बनत गेले,’ असे ‘निर्लेप अप्लायसन्सेस’चे संचालक राम भोगले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

कंपनी स्थापनेपासूनच उत्तम अवस्थेत होती, मात्र तिची वाढ आणि विस्तार सद्य:स्थितीत अशक्य बनला. नोटाबंदी आणि नवी वस्तू व सेवा या अप्रत्यक्ष करप्रणालीने व्यवसाय चालविणे अधिकच अवघड बनले.   – राम भोगले, संचालक, निर्लेप अल्पायन्सेस.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirlep bajaj gst