अमोल कीर्तीकर, शिवसेना (ठाकरे गट) वायव्य मुंबई .
शिवसेनेचे विभाजन झाल्याने लढत कठीण वाटतेय?
● अजिबात नाही. या घटनेला आता दोन वर्षे होतील. अखेर रवींद्र वायकरही निघून गेलेत. तरीही एक बाब नक्की की, मूळ शिवसैनिक आज आहे तेथेच आहेत. ते तसूभरही ढळलेले नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितली. तेव्हापासून आम्ही सर्व जण तयार आहोत. विजय आमचाच आहे. यंदा मताधिक्य चार लाखांच्या आसपास असेल. वडील दहा वर्षे खासदार असले तरी आपण कायम कार्यकर्ते राहिलो व खासदार झाल्यानंतरही आपण कार्यकर्तेच राहू.
खासदार वडील शिंदे गटात असल्याचा फटका बसेल?
● ती बाब आता जुनी झाली. आधीच सांगितल्याप्रमाणे माझा मतदारांशी वैयक्तिक संबंध आहे. त्यामुळे माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय ते पाहून मीही भारावून गेलो आहे. सामान्य कार्यकर्त्याचा खासदार होतो आणि तो पंचतारांकित आयुष्य जगू लागतो. सामान्य कार्यकर्त्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. मला कायम सामान्यच राहायचे आहे आणि कधीही लोकांसाठी उपलब्ध व्हायचे आहे. उद्धव व आदित्य ठाकरे हे आमेच ब्रँड आहेत. त्यांच्यामुळेच मतदारांचे प्रेम मिळते. त्यांचे आदेश आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. बाकी बाबींचा अजिबात विचार करीत नाही.
हेही वाचा >>> फडणवीस यांच्या सभांचे शतक पूर्ण
निवडणुकीच्या तोंडावर ‘ईडी’कडून सुरू झालेल्या चौकशीबाबत तुमची भूमिका काय आहे ?
● माझ्यावर या चौकशीच्या निमित्ताने दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. वडील शिंदे गटात गेले तेव्हाही हाच प्रयत्न झाला. अशा कुठल्याही चौकशीला आपण घाबरत नाही. आपण कुठलाही घोटाळा केलेला नाही तर चिंता कशाला करू? जे घाबरले ते आज कुठे आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही मावळे आहोत. लढायचे हे आम्हाला माहिती आहे.
हेही वाचा >>> भाजपला साधे बहुमत मिळणेही अवघड ; पृथ्वीराज चव्हाण यांचा अंदाज; राज्यात महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागांचा दावा
प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत?
● खासदाराने आजही गटार, वीजजोडणी, पाणी प्रश्न सोडवावा, अशी लोकांची अपेक्षा असते. त्याला आपण काहीही करू शकत नाही. माझ्या मतदारसंघात वनजमिनीवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक काळ रेंगाळलेला आहे. हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारीत असला तरी अतिरिक्त चटईक्षेत्रफळाचा लाभ देऊन हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. जोगेश्वरीतील गुंफा संवंर्धनाचे काम महत्त्वाचे आहेच. परंतु यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचा विकास कायमचा खुंटला गेला आहे याचा विचार केला जात नाही. वेसावे आणि जुहू कोळीवाड्याच्या पुनर्विसाकासाठी विकास नियंत्रण नियमावली याचबरोबर कायमस्वरूपी टपाल कार्यालये माझ्या मतदारसंघात उभी राहावीत यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.