मुंबई : भारतीय कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक असे ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ शुक्रवारपासून प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. या सांस्कृतिक केंद्राच्या दिमाखदार उद्घाटन सोहळय़ाला जगभरातील नामवंत कलाकारांसह अनेक उद्योजकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक उपस्थित होते.
या सोहळय़ाच्या निमित्ताने भारतीय कला देश-विदेशात पोहोचावी यासाठी वीणा, तबलावादन सादर करण्यात आले. दोन दिवस सुरू राहणाऱ्या या सोहळय़ाची सुरुवात ‘द ग्रेट इंडियन म्युजिकल- सिविलायजेशन टू नेशन’ या कार्यक्रमाने झाली. फिरोज अब्बास खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या कार्यक्रमात ८०० कलाकारांनी नृत्य, गायनातून भारतीय कला आणि संस्कृती सादर केली. शास्त्रीय संगीताच्या सूरमय वातावरणात हा सोहळा पार पडला.
नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या या उद्घाटन सोहळय़ाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, भाजप नेते प्रसाद लाड, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. भारतीय कला आणि संस्कृती जपणाऱ्या या केंद्राच्या उदघाटन सोहळय़ासाठी उद्योजक, आंतरराष्ट्रीय कलाकार, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, गायक, क्रिकेटपटू अशा विविध क्षेत्रातील जवळपास १८०० नामवंत मंडळी उपस्थित होते.