शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी गजानन कीर्तीकर भाजपा आम्हाला लाथा घालत आहे, नीट वागणूक देत नाहीत असं सांगत असल्याचं म्हटलं. तसेच भाजपावर सडकून टीका केली. यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी राणेंनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे रक्ताचे भाऊ जेवढा सन्मान देणार नाही, तेवढा देवेंद्र फडणवीसांनी दिला, असंही म्हटले. ते शनिवारी (२७ मे) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, “संजय राऊतांना आमच्या गजानन किर्तीकरांवर फार प्रेम ओतू येत होतं. जेव्हा हे आमदार खासदार यांच्याकडे होते तेव्हा संजय राऊतांचे मालक या आमदार-खासदारांना अनेकदा अपमानित करत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना भेटण्यासाठी गजानन किर्तीकर, दिवाकर रावते आणि अन्य आमदार खासदारांना तासांतास वर्षा बंगल्यावर बसून राहायचे. उद्धव ठाकरे त्यांना भेटच द्यायचे नाहीत.”
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही तिन्ही पक्षात सर्वात कमी निधी तेव्हा शिवसेनेच्या आमदारांना”
“राऊत म्हणतात भाजपाकडून शिवसेनेच्या आमदार-खासदारांवर अन्याय झाला आणि म्हणून आम्ही बाहेर निघालो. मविआत मुख्यमंत्रीपदाचं चॉकलेट देऊन त्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अर्थमंत्री अजित पवारांनी किती निधी दिला. त्यावेळी यांच्या आमदार-खासदारांनी किती तक्रारी केल्या. माझ्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही तिन्ही पक्षात सर्वात कमी निधी तेव्हा शिवसेनेच्या आमदारांना मिळाला,” असा आरोप नितेश राणेंनी केला.
“कुठल्याही आमदाराला विचारा की, मी खरं बोलतोय की खोटं”
नितेश राणे पुढे म्हणाले, “कुठल्याही आमदाराला विचारा की, मी खरं बोलतोय की खोटं बोलतो आहे. अजित पवारांनी तेव्हाच्या शिवसेना आमदारांना सर्वात कमी निधी दिला हे सत्य आहे. हे भाजपाबद्दल बोलतात, मात्र भाजपाबरोबर युती असताना राऊतांच्या मालकांना त्यांच्या मुलांना, तेव्हाच्या आमदारांना आमचे देवेंद्र फडणवीस खूप मान-सन्मान द्यायचे.”
“”उद्धव ठाकरेंना त्यांचे रक्ताचे भाऊही जेवढा सन्मान देणार नाहीत त्यापेक्षा…”
“उद्धव ठाकरेंना त्यांचे रक्ताचे भाऊही जेवढा सन्मान देणार नाहीत त्यापेक्षा जास्त सन्मान देवेंद्र फडणवीसांनी दिला. ते यांचे जास्तीत जास्त लाड पुरवायचे. म्हणूनच फडणवीसांनी मातोश्री दोनच्या सर्व परवानग्या मिळून दिल्या,” असंही राणेंनी सांगितलं.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले, “माझ्याकडच्या माहितीनुसार फुटलेल्या गटात अस्वस्थता आहे. नाराजी आहे. फुटलेल्या गटातही दोन गट पडले आहेत. कीर्तीकरांनी सांगितलेली भूमिकाच शिवसेनेची पहिल्यापासून होती. त्याच चिडीतून आम्ही भाजपापासून दूर गेलो. त्यांनी दिलेले शब्द पाळले नाही, सत्तेत असताना आपल्या लोकांना निधी मिळू दिला नाही. शिवसेनेच्या प्रमुख लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला.”
“शिवसेनेला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला नाही. अशावेळी महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली. तेच गजानन कीर्तीकर सांगतायत की आम्हाला लाथा घालतायत, आम्हाला नीट वागणूक देत नाहीत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटाबरोबरच भाजपावर टीकास्र सोडलं.
हेही वाचा : “संजय राऊत मविआची गौतमी पाटील, ती नाचते आणि लोकांना…”, नितेश राणेंचा हल्लाबोल
“भाजपानं त्यांचा मूळ स्वभाव, मूळ भूमिका सोडलेली नाही. ती कायम आहे. कीर्तीकरांसारखा आमचा सहकारी तिथे जाऊनही सुखी नाही, म्हणजे काल मी म्हणालो तसं भाजपानं हा कोंबड्यांचा खुराडा पाळलाय. आता त्यातली एकेक कोंबडी त्यांनी कापायला सुरुवात केली आहे”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.