मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुंबई पालिकेत टेंटर, बदल्यांवरून टाईमपास सुरू आहे. मुंबईतील रस्त्यांसाठी ५ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. मात्र मर्जीतील लोकांना टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या याच प्रश्नाला आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. युवराजांना मिळणारी टक्केवारी कमी झाली आहे. मुंबईतील ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत, आदित्य ठाकरेंनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना ही कामे दाखवतो, असे नितेश राणे म्हणाले आहेत.
“उद्धव सेनेतील युवराजांची व्यथा मी समजू शकतो. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून युवराजांना मिळणारी टक्केवारी थांबली आहे. शिंदे-फडणवीस सरकार लोकहिताचे काम करत आहे. त्यामुळेच सतराशे कोटींचा निधी विकेंद्रित करून तो वापरण्याचा संपूर्ण अधिकार २२७ वार्डांना देण्यात आला आहे. त्यात कुठलेही राजकारण न करता संपूर्णत: लोकहिताचा विचार करता प्रत्येक वार्डात निधी दिला आहे,” असे नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा >>> “२५ वर्षं तुम्ही काय केलंत? तर तुम्ही…” शीतल म्हात्रेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल, मुंबईचे लचके तोडल्याचाही आरोप
“आदित्य ठाकरे त्यांच्या वरळी या मतदारसंघात फिरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना संपूर्ण मुंबईची परिस्थिती माहिती नाही. आदित्य ठाकरे माझ्यासोबत चला. मी तुम्हाला वार्डांमध्ये चाललेले कामे दाखवतो. तुम्हीच नेमलेल्या मुंबई आयुक्त तथा प्रशासकांवर तुम्ही आरोप केले आहेत. ते तुमच्याच कार्यकाळातील पाप आहे. आम्हाला तुम्ही नेमलेल्या आयुक्तांची तथा प्रशासकाची गौरवगाथा माहिती आहे. म्हणूनच शिंदे-फडणवीस सरकारने कॅगच्या चौकशीचे आदेश दिले आहेत,” असा टोलादेखील नितेश राणे यांनी लगावला.