महसूलमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीतेश राणे यांनी त्यांचा एकेकाळचा कार्यकर्ता चिंटू शेख याच्यावर केलेल्या हल्ल्याचा तपास सुरूच ठेवण्याचे आदेश महानगर दंडाधिकाऱ्यांनी शनिवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले.
सीबीआयने या प्रकरणाचा तपास बंद करण्याबाबतचा अहवाल न्यायालयास पूर्वीच सादर केला आहे.
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस मंत्र्यांचा मुलगा अडचणीत येऊ नये म्हणून पक्षपात करीत असल्याचा आरोप करीत चिंटू शेख यांनी नंतर उच्च न्यायालयात धाव घेत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य करीत सीबीआयकडे तपास सोपविला होता. गेल्या वर्षी सीबीआयने प्रकरणाचा तपास बंद करण्याबाबत अहवाल सादर केला होता.
हा अहवाल शनिवारी महानगरदंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने प्रकरणाचा तपास केलेला नाही. शिवाय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारही प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे, तर प्रकरण बंद करण्याबाबत सादर केलेला अहवालही पूर्णपणे स्वीकारण्याजोगा नसल्याचे स्पष्ट करीत अतिरिक्त महानगरदंडाधिकारी बी. वाय. काळे यांनी सीबीआयचा हा अहवाल फेटाळून लावला.
गुन्ह्याचे स्वरुप, त्यातील गुन्हेगार लक्षात घेता सीबीआयने नव्याने प्रकरणाचा तपास करावा आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार करावा, असे आदेश सीबीआयला दिले.

Story img Loader