केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना, खळबळजनक विधान केल्याचं समोर आल्याचे पडसाद मुंबईमध्ये पहायला मिळाल्याचे संकेत राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या ट्विटवरुन मिळत आहे. सोमवारी भर पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असं मुख्यमंत्र्यांबद्दल म्हटलं आहे. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेनेच्या युवासनेच्या कार्यकरत्यांना राणेंच्या जुहूमधील घराबाहेर जमण्यास सांगण्यात आल्याचं नितेश यांनी रात्री एक वाजून १० मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नितेश राणेंनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी थेट शिवसेनेला सिंहाच्या गुहेत येण्याची हिंमत करु नका अशा शब्दांमध्ये आव्हान दिलं आहे. “युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहूमधील घराबाहेर गोळा होण्यास सांगण्यात आल्याचं ऐकलं. मुंबई पोलिसांनी त्यांना इथे येण्यापासून थांबवावे किंवा त्यांनी थांबवलं नाही तर जे काही होईल ती आमची जबाबदारी नसेल. सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत,” असं नितेश राणेंनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

राणे नक्की काय म्हणाले?

सोमवारी रायगडमधील महाड येथे राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याचवेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाचा उल्लेख करत, “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं म्हटलं.

“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे.” असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.