राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची २३ फेब्रुवारी रोजी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घेतलं जातं, असं म्हटलं होतं. पवार यांच्या याच वक्तव्यावरुन आता भाजपा नेते नितेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. मुंबईमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी अनिल देशमुख प्रकरण आणि नवाब मलिक प्रकरणाची तुलना करत पवारांवर टीका केली.
नक्की वाचा >> देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांनंतरचे खरे हिंदुहृदयसम्राट : नितेश राणे
कोणत्या कार्यक्रमात बोलत होते नितेश राणे?
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने अणुशक्तीनगर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अणुशक्तीनगरमधील विधानसभा वॉर्डमधील कार्यकर्ता संमेलनासाठी नितेश राणेही उपस्थित होते. यावेळेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना नवाब मलिक प्रकरणावरुन धार्मिक संदर्भाचा उल्लेख करत प्रश्न विचारला.
“…तोच न्याय नवाब मलिकांना का लावत नाही?”
“तो मुस्लीम कार्यकर्ता आहे म्हणून तो दाऊदच्या संपर्कात आहे. वा बाबा! माननीय पवारसाहेब हे फार मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने त्यांच्याबद्दल बोलता पण कामा नये. पण मी जे बोलतोय ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही, पण या देशाचा एक नागरिक म्हणून मला पवारसाहेबांना विचारायचंय. अहो पवारसाहेब हा दाऊदबरोबर बसणारा उठणार व्यक्ती आहे, जो तुमच्या पक्षाचा नेता, मंत्रीमंडळाचा सदस्य आहे. त्यांचा तुम्ही राजीनामा घेत नाही तर अनिल देशमुखांचा राजीनामा का घेतला? मग तोच न्याय नवाब मलिकांना का लावत नाही?,” असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला.
नक्की पाहा >> Video: : विधानसभेत फडणवीसांच्या भाषणादरम्यान गिरीश महाजनांना लागली डुलकी
“देशाविरोधात कारवाई करतायत म्हणून…”
तसेच पुढे बोलताना, “अहो, अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले म्हणून ते आतमध्ये आहेत, देशद्रोही म्हणून आतमध्ये नाहीयत. देशाविरोधात कारवाई करतायत म्हणून आतमध्ये नाहीयत. त्यांचा राजीनामा तुम्ही लगेच घेता तर नवाब मलिकांचा का घेत नाही? मग आम्ही असं म्हणायचं का अनिल देशमुख एक हिंदू आहेत, मराठा आहेत म्हणून त्याचा राजीनामा लगेच घेतला. नवाब मलिक एक मुस्लीम कार्यकर्ता आहेत म्हणून त्याचा राजीनामा तुम्ही घेत नाही असं विचारलं तर चालेल का?,” असा प्रश्नही नितेश राणेंनी उपस्थित केला.
नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल
“त्यांना कधी तुम्ही विचारायला गेलात का?”
त्याचप्रमाणे दोन वेगवेगळ्या मंत्र्यासंदर्भात दोन वेगळे न्याय का असंही नितेश यांनी विचारलं. “एका कार्यकर्त्याला एक न्याय, दुसऱ्या कार्यकर्त्याला एक न्याय. असं कसं चालणार? कसं चालणार पवारसाहेब आम्हाला उत्तर द्या. इथं हिंदू-मुस्लीम हा विषय नाहीय. अहो, त्या २५६ लोकांमध्ये कित्तेक आपले मुस्लीम बांधव पण गेले असतील. त्यांच्यापण घरात अंधार झाला असेल. त्यांना कधी तुम्ही विचारायला गेलात का? त्या दाऊदने ज्या उठसूट कारवाया केल्या त्यात त्याने केवळ हिंदूंना मारण्याचा प्रयत्न केला काय? आमचं फक्त म्हणणं ऐवढच आहे, जो आपल्या देशाच्या विरुद्ध कारवाई करतोय, जो आमच्या मुंबईच्याविरोधात कारवाई करतोय, त्याचा जो बिझनेस पार्टनर आहे त्याचा तुम्ही राजीनामा घ्या आणि बडतर्फ करा,” असंही नितेश म्हणालेत.
वाचा >> दिशा सालियन प्रकरण : नितेश राणेंनी केला राज ठाकरेंचा उल्लेख; म्हणाले, “राज ठाकरेंची शिवसेनेमधील…”
“हिंमत राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे का?”
“सांगा तुम्ही, संदेश द्या सगळ्यांना आम्हाला हे चालणार नाही. जो माझ्या देशाच्या, मुंबईच्या, राज्याच्याविरोधात असेल त्याला मी राष्ट्रवादी पक्षामध्ये ठेवणार नाही, असा संदेश देण्याची हिंमत राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे का?, हा प्रश्न मला त्यांना आजच्या निमित्ताने विचारायचाय,” असं नितेश राणेंनी शरद पवारांवर टीका करताना म्हटलं.