धारावीमध्ये दोन गटांत वाद झाल्याने नितेश राणे थेट पीडित कुटुंबीयांच्या घरी पोहोचले आहेत. पीडित कुटुंबीयांना जबर मारहाण झाल्याने नितेश राणे यांनी पोलिसांनाच दम भरला. संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करून लवकरात लवकर प्रकरण संपवण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
धारावीत व्हॉलिबॉल खेळण्यावरून वाद झाला असून या वादात काही महिला आणि मुलांना जबर मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात ज्या महिलांना मारहाण झाली, त्या पीडित महिलांची भाजपा नेते नितेश राणे यांनी भेट घेतली. यावेळी पोलीस अधिकारीही तिथे हजर होते. या पोलीस अधिकाऱ्यांना पीडितांसमोरच त्यांनी दम भरला. संबंधित जागेत जर कोणी व्हॉलिबॉल खेळताना परत कोणी दिसलं तर थेट अंगावर गाडी घालीन, अशी धमकीही नितेश राणे यांनी यावेळी दिली.
नवव्या दिवशी मोर्चा काढू
मारहाण केलेल्या लोकांविरोधात ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. महिलांच्या हाताला आणि डोक्याला लागलं आहे. मग याविरोधात तक्रार नको का? यापुढे मला त्या मैदानावर एकही मुलगा नको आहे. त्या पालिकेवर काय बनवायचं आहेते आम्ही पालिकेकडून करून घेऊ. पण, पुढील आठ दिवसांत मैदान रिकामे झाले नाहीतर नवव्या दिवशी मोर्चा काढू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
तर अंगावर गाडी घालू
यावेळी त्यांना पोलिसांसमोरही आरेरावी केली. ते म्हणाले की, तुम्हाला वाचवायला ते येणार की आम्ही येणार? सरकार कोणाचं आहे? तुम्ही तक्रार दाखल करा. मेडल आम्ही देणार आहोत, ते नाही देणार नाहीत. ही मुंबई आहे की पाकिस्तान. मैदानावरील दुकानं काढून टाका. ऑफिसर असतानाही इथं सहन करावं लागतंय. एकालाही तिथे खेळायला दिलं तर येऊन अंगावर गाडी चालवणार. तिथं कोणालाच व्हॉलिबॉल खेळूच देऊ नका. कायदा आणि सुव्यवस्था आम्ही नाही खराब करत, तेच लोक करतात”, असंही नितेश राणे म्हणाले.