मुंबईसाठी भाजपाने भरपूर काही केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईसाठी ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं गिफ्ट दिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टीतून मेट्रोसारखा प्रकल्प मुंबईकरांसाठी आणला आहे. या सर्व गोष्टींचा फायदा मुंबईला होणार आहे. मुंबईला लिहण्यापूरतच आर्थिक राजधानी हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी ठेवलं होतं. पण, आज मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होतं आहे, असं भाजपा आमदार नितेश राणेंनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच, पंतप्रधान मोदी मुंबईत उद्घाटन करत असलेल्या प्रकल्पांची कामं महाविकास आघाडीने केली. भाजपा आणि शिंदे सरकार यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप शिवसेनेने केला. यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “घटनाबाह्य म्हणायचं आणि सरकारच्या सर्व सवलती, सुरक्षा, ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहीरात छापून पैसे मिळवायचे. थोडी लाज आणि स्वाभिमान उरला असेल, तर उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी जाहीर करावं की हे सरकार घटनाबाह्य असून, आम्हाला काहीच नको. ठाकरे कुटुंबीयांमध्ये आहे का हिंमत,” असं आव्हान नितेश राणेंनी दिलं आहे.

हेही वाचा : “डांबरीकरणाच्या नावाखाली…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या हातात काहीच राहिलं नाही. उद्या चिन्ह एकनाथ शिंदेंना भेटणार, असा आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयाने आपली बॅग पॅक करुन निघून जावं. कारण मुंबई आणि महाराष्ट्रात काही कामच राहिलं नाही. उद्धव ठाकरेंचं आवडतं शहर लंडन असून, तिथे स्थायिक व्हावं. बॅगा उचलण्यासाठी अनिल परब आणि अनिल देसाई आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचं असेल, तर हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारचा आदर ठेवावा लागेल,” असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane warning uddhav thackeray say live mumbai and maharashtra respect shinde bjp govt ssa