गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यावर माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी प्रदान केलेला हिऱ्यांच्या हाराची किंमत किती होती, हे भाजपने जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादीने गुरुवारी दिले आहे.
मोदी यांच्या नावाची घोषणा झाल्यावर व्यासपीठावर बसलेल्या साऱ्याच नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन मोदी यांचे अभिनंदन केले. त्याच वेळी गडकरी यांनी मोदी यांच्या गळ्यात हिऱ्यांचा हार घातला. काही काळ मोदी यांनी तो हार गळ्यात ठेवला होता. थोडय़ा वेळाने मोदी यांनी हार काढला आणि आपल्या सचिवाकडून सुपूर्द केला याकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लक्ष वेधले. हा हार किती किंमतीचा होता हे सर्वसामान्य जनतेला समजले पाहिजे व हार सध्या कोठे आहे याची माहिती पुढे आली पाहिजे, असेही मलिक यांनी सांगितले.

Story img Loader