पाण्यापाठोपाठ कांद्यासाठी बैठक; शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

पाण्याच्या प्रश्नापाठोपाठ कांद्यासाठी बैठक घेतल्याने राज्यातील प्रश्नात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष घातले आहे. गडकरी एवढे सक्रिय का झाले, याची चर्चा मग राजकीय वर्तुळात लगेचच सुरू झाली आहे.

भूपृष्ठ वाहतूक, बंदरे या खात्यांच्या माध्यमातून गडकरी राज्याला नेहमीच भरीव मदत करतात. अलीकडेच राज्यातील रस्त्यांच्या कामांसाठी त्यांनी निधी मंजूर केला किंवा अनेक प्रस्तावही मंजूर केले. डहाणूजवळ वाढवण बंदर उभारण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला. याशिवाय जल वाहतूक सुरू व्हावी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात मंत्रिपद भूषविणारा मंत्री आपल्या खात्याच्या माध्यमातून मतदारसंघ किंवा आपल्या राज्यात जास्तीत जास्त निधी किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, राम नाईक, विलासराव देशमुख, प्रफुल्ल पटेल यांच्यासह बहुतांशी  केंद्रातील माजी मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचे प्रकल्प सुरू केले होते. गडकरीही त्याला अपवाद नाहीत. राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक विणण्याबरोबरच नागपूर या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यावर त्यांचा भर असतो.

गडकरी यांनी बुधवारी कांद्याच्या प्रश्नाबाबत नवी दिल्लीत राज्यातील नेत्यांबरोबर बैठक घेतली. कृषीमंत्री राधामोहन सिंग आणि अन्न व नागरीपुरवठामंत्री रामविलास पासवान यांना गडकरी यांनी निमंत्रित केले होते. कांद्याच्या दरावरून सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दर पडल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास नाशिक पट्टय़ात भाजपला फटका बसू शकतो. हे लक्षात घेऊनच गडकरी यांनी तोडगा काढण्याकरिता बैठक घेतली होती. गडकरी यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या कारभाराचा घोळ नेमका पुढे आला. कारण कांद्याच्या खरेदीबाबत केंद्राने केव्हाच प्रस्ताव पाठविला होता याकडे राधमोहन सिंग यांनी लक्ष वेधले.

गेल्या मे महिन्यात राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले तेव्हा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत गडकरी यांचेही नाव होते. तेव्हा विदर्भातील बहुतांशी आमदारांनी गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी धाव घेऊन नेतृत्व करावे, अशी मागणी केली होती. आपल्याला महाराष्ट्रात परतण्याची इच्छा नाही, केंद्रात काम करायचे आहे, असे नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे. ज्या घोषणा केल्या त्या प्रत्यक्षात करूनच दाखविणार, अशी ग्वाही गडकरी देतात. मात्र, गडकरी यांनी राज्यातील प्रश्नात लक्ष घातल्याचे त्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

Story img Loader