भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीवरून गडकरी-मुंडे गटात सुरू झालेले शीतयुद्ध चांगलेच तापले आहे. गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा पक्षाला विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी यांच्या सत्काराला या शीतयुद्धाची झळ लागली असून, मोदी सत्काराचा समारंभ अखेर रद्द करावा लागला आहे. गडकरी पायउतार झाल्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेले राजनाथ सिंह यांचाही सत्कार गडकरी गटाने हाणून पाडला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा येत्या १७ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे भाजपच्या प्रदेश कार्यालयातून रविवारी जाहीर करण्यात आले आणि गडकरी-मुंडे गटातील धुसफुशीची चर्चा रंगू लागली. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांचीच त्या पदावर फेरवर्णी लागावी यासाठी गडकरी गटाने प्रतिष्ठा पणाला लावली आहे, तर मुंडे गट मुनगंटीवार यांना हटविण्यासाठी सक्रिय झाला आहे. मुंडे यांचे विरोधक मानले जाणारे विनोद तावडे आणि गडकरी समर्थक मुनगंटीवार यांनी शनिवारी राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर काही तासांतच सत्काराचा हा कार्यक्रम रद्द करावा लागणे हा केवळ योगायोग नाही, तर गडकरी गटाच्या चाणक्यांचा मुंडे गटावरील कुरघोडीचा पहिला यशस्वी डाव असल्याचे मानले जात आहे.
गेल्या आठवडय़ात झालेल्या नेत्यांच्या बैठकीत १७ मार्चच्या सत्कार समारंभाला अंतिम स्वरूप देण्यात आले, तेव्हा हे नेतेही त्या बैठकीस हजर होते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा विजय ही पक्षाच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे, असे कौतुकोद्गार काढत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीच मोदी यांची तोंडभर स्तुती केली होती. गडकरी पायउतार होताच मोदी यांचे पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील वजन वाढले. शिवाय, गडकरींना पायउतार व्हावे लागल्यामुळे पक्षाध्यक्ष झालेल्या राजनाथ सिंह यांचा सत्कार हादेखील गडकरी गटाला चिमटाच होता.
मोदी यांच्या सत्कारामुळे मुंबई-ठाण्यातील गुजराती मतदार सुखावतील व आगामी निवडणुकीत त्याचा फायदा होईल असा या कार्यक्रमाचे आयोजन करणारे मुंबई भाजपाध्यक्ष राज पुरोहित व माजी अध्यक्ष प्रकाश मेहता यांचा दावा होता. हे दोघेही मुंडे समर्थक मानले जातात. मात्र, महाराष्ट्रात दुष्काळाचे थैमान सुरू असताना सत्काराचा भपकेबाज कार्यक्रम केल्यास जनतेमध्ये वाईट संदेश जाईल व राजकीय टीकाकारांनाही आयती संधी मिळेल, असे बिनतोड कारण सांगत गडकरी समर्थकांनी राजनाथ सिंह यांना सत्कारापासून परावृत्त केल्याचे कळते. आता कुरघोडीचा पहिला फासा गडकरी गटाच्या बाजूने पडल्याने मुंडे गटाची पुढची खेळी काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गडकरी-मुंडे वादात मोदींचा सत्कार रद्द!
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीवरून गडकरी-मुंडे गटात सुरू झालेले शीतयुद्ध चांगलेच तापले आहे. गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा पक्षाला विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी यांच्या सत्काराला या शीतयुद्धाची झळ लागली असून, मोदी सत्काराचा समारंभ अखेर रद्द करावा लागला आहे.
First published on: 11-03-2013 at 02:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari gopinath munde conflict cancelled narendra modi honour ceremony