लोटांगणामुळे भाजप नेते संतापले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले असताना भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर आणि आमदार-खासदारांवर आरोप करीत असलेल्या ठाकरे यांच्यासोबत गडकरींनी भोजन घेऊन मध्यरात्री उशिरापर्यंत केलेल्या चर्चेमुळे पक्षातील नेत्यांमध्ये संताप भावना आहे. कोणत्या उद्दिष्टांच्या ‘पूर्ती’साठी गडकरींनी हे ‘राज’कारण केले आणि लोटांगण घातले, याची खमंग चर्चा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. राज ठाकरे राज्यभर दौरा करीत असून त्यांनी सिंचन गैरव्यवहारात भाजप आमदार मितेश बगाडिया व खासदार अजय संचेतींना प्रकल्पांची कामे दिल्याचा आरोप केला होता. त्यावर कडी करीत थेट खडसे हे सकाळी आरोप आणि सायंकाळी ‘सेटलमेंट’ करीत असल्याचे टीकास्त्र सोडले. खडसे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले, तरी ते पक्षातही एकाकी पडले असल्याचे चित्र गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवारांसह अन्य भाजप नेते त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत किंवा त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे, असे दिसून आले नाही. प्रदेशाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी शिफारस केलेल्या देवेंद्र फडणवीस यांना खडसे यांनी पाठिंबा दिल्याने गडकरी नाराज असल्याचे समजते. त्यामुळे गडकरी मंगळवारी विधानभवनात आले असतानाही त्यांनी खडसे यांच्याशी चर्चा केली नाही किंवा त्यांची बाजू घेत कोणतेही निवेदनही केले नाही. आरोप-प्रत्यारोप होऊ नयेत, असे आवाहन मुंडे यांनी काल सकाळी केले होते. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपची बाजू घेतली होती.
भाजप व मनसेमध्ये तणावाचे वातावरण असताना गडकरी यांनी मात्र राज ठाकरे यांच्याकडे रात्री उशिरा जाऊन भोजन व चर्चा केली. यामुळे पक्षाचा कोणता सन्मान राखला गेला, असा प्रश्न काही नेते खासगीत उपस्थित करीत आहेत. ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर जात असून त्यांनी भाजप आमदार किंवा ‘पूर्ती’तील गैरव्यवहारांवर टीका करु नये, अशी विनंती गडकरींनी केल्याचे समजते. भाजप-शिवसेना-रिपब्लिकन युतीमध्ये मनसेचा समावेश करण्याची भूमिका मुंडे यांनी अनेकदा जाहीरपणे घेतली असताना त्याबाबत गडकरी यांनीही काही चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा