नागपूरमधील आपल्या मतदारसंघातील झोपडपट्टीबाबतचे प्रश्न वारंवार पाठपुरावा करूनही सुटत नसल्याने नाराज झालेल्या रोहयो व जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी रविवारी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिला. मात्र, तो अद्याप मंजूर करण्यात आला नसून प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडून राऊत यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मतदारसंघातील झोपडपट्टीच्या प्रश्नावर राऊत आक्रमक असून ते सोडवण्यासाठी सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने ते नाराज झाले होते. सोमवारी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना रविवारी सायंकाळी राऊत यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेत मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
राऊत सध्या नाराज असले तरी आम्ही त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सोमवारी सकाळी त्यांना चर्चेला बोलावल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
मध्यंतरी जलसंधारण खात्याच्या कारभाराबद्दल मुख्यमंत्री चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून राऊत यांचे बिनसले होते, असे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा