मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) चे नेते नितीश कुमार हे गुरुवारी मुंबईत येत आहेत. या भेटीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, अशी माहिती जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार कपिल पाटील यांनी दिली. नितीश कुमार यांच्याबरोबर विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर आणि मंत्री संजय कुमार झा असतील.
विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी नितीश कुमार देशभर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नीतीश कुमार यांनी भेट घेतली आहे. ठाकरे यांनी नितीश कुमारांना ‘मातोश्री’वर स्नेहभोजनाचं आमंत्रण दिले आहे. त्यानंतर नितीश कुमार ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करतील.