मुंबई : काेलकाता येथे निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. निवासी डॉक्टरांच्या संघटनेने यासाठी राष्ट्रीय आंदोलन पुकारले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी धोरण आखण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालयातील प्राध्यापक, वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांसाठी महाविद्यालय आणि रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, रुग्ण कक्ष, अपघातग्रस्त विभाग, कामगार कक्ष आदी कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी धोरण आखावे. हे धोरण तयार करताना कामाच्या ठिकाणांबरोबरच वसतिगृहे व तेथील मोकळा परिसर, रुग्णालयातील खुल्या जागा या ठिकाणी महिला व पुरुष सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून पुरेशा सुरक्षा उपाययोजना कराव्या. जेणेकरून डॉक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित असल्याची भावना निर्माण होईल. तसेच डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे जाता यावे यासाठी रुग्णालय परिसरात विशेष मार्ग तयार करावा, या मार्गावर सुरक्षा रक्षकांसह सायंकाळी व रात्री दिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व संवेदनशील परिसरामंध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आदी सूचना आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयांना केल्या आहेत.
वैद्यकीय विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या घटनेची महाविद्यालय व्यवस्थापनाने तातडीने चौकशी करावी. पोलिसांत प्राथमिक तपासणी अहवाल (एफआयआर) दाखल करावा. तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील हिंसाचाराच्या घटनेवरील कारवाईचा तपशीलवार अहवाल ४८ तासांच्या आत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे पाठवावा, अशा सूचना आयोगाने देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना केल्या आहेत.