लोकसंख्या दिवसागणिक झपाटय़ाने वाढणाऱ्या नवी मुंबईतील निकृष्ट इमारतींना अडीच एफएसआय प्राप्त झाल्यास येथील रहिवाशांच्या घरांचा प्रश्न सुटणार आहे. वाढीव एफएसआयमुळे निर्माण होणाऱ्या गृहसंकुलातील लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता या शहराची आहे, असा स्पष्ट अहवाल नवी मुंबई पालिकेने शासनाला दिलेला असताना सिडकोने तीन एफएसआय मिळाल्यास अधिक घरनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
यासाठी सिडकोने वाशी येथील जेएनवन जेएनटू इमारतींच्या भूखंड व घरांचे क्षेत्रफळ प्रस्तावात चुकीचे नमूद केल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. त्यामुळे या ठिकाणी तीन एफएसआयने टोलेजंग इमारती उभारणे शक्य आहे का असा प्रश्न पडला आहे.
नवी मुंबईत सध्या वाढीव एफएसआयचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एफएसआयचा प्रश्न येथील पुढील तीन निवडणुकांमधील प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे.
पालिकेने शहरात नव्याने जल व मलवाहिन्या टाकून या शहरातील वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या रस्ते, गटार यांसारख्या सुविद्यांची गरज भागवली आहे असा पालिकेचा दावा आहे. त्यामुळे क्रिसिल या सव्र्हेक्षण संस्थेचा हवाला देऊन शहराला अडीच एफएसआय दिल्यास वाढत्या रहिवाशांना सुविद्या पुरविणे शक्य आहे असा एक प्रस्ताव १४ माहिन्यांपूर्वी पालिकेने सरकारला पाठविला आहे. त्यावर सरकार अद्याप निर्णय घेत नाही. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षातील बेचैनी वाढली आहे. हा प्रस्ताव सरकारकडे मंजूरीसाठी धूळ खात पडला असताना सिडकोने एक नवी खेळी खेळली असून नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बाधणी करताना तीन एफएसआय प्रस्तावित केला आहे. पालिका अडीच एफएसआय मागत असताना सिडकोने तीन एफएसआय मागून वरचढपणा केला आहे. पण हा एफएसआय मागताना सिडकोने संचालक मंडळात सादर केलेला प्रस्ताव रहिवाशांची दिशाभूल करणारा असल्याचे दिसून येते. तीन एफएसआयमध्ये सिडकोला हिस्सा हवा आहे हे यातून स्पष्ट होत आहे.
जेएनवन प्रकारातील २८ इमारतींच्या खालील भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ ११ हजार १६५ चौरस मीटर असताना सिडकोने ते १४ हजार ९९५ चौरस मीटर दाखविले आहे. यावर तीन एफएसआय सरकारने दिल्यास तयार होणारी तीन लाख ५५ हजार चौरस फुटांची घरे विद्यमान रहिवाशांना मिळणार आहेत. एक लाख ८४ हजार चौरस फूट ही घर बांधणाऱ्या विकासकाच्या पदरात पडणार आहेत. शिल्लक घरे सिडको इतर नागरिकांना विकणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.सिडकोने ११ हजार चौरस मीटरचा भूखंड चार हजार मीटरने जास्त दाखविल्याने घरांचे हे गणित मांडले आहे.
जेएनवन इमारतीतील भूखंडाच्या या घोळानंतर जेएनटू इमारतीतील सर्व रहिवाशांच्या घरांचे क्षेत्रफळ कमी नोंद करण्यात आले आहे. त्यामुळे रीतसर पालिकेला शुल्क भरल्यानंतर परवनागी घेऊन बांधण्यात आलेल्या बाल्कनींचे क्षेत्रफळ सिडकोने या घरांच्या एकूण क्षेत्रफळात मोजलेले नाही. त्यामुळे मोठे घर असणारे रहिवासी छोटे घर घेण्यास कधीही तयार होणार नाहीत. हा तिढा सिडकोच्या अधिकाऱ्यांनी तयार केला असून आवळा दाखवून कोवळा काढण्याचा हा प्रकार मानला जात आहे.
वाढीव एफएसआयचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर
नवी मुंबईतील मोडकळीस इमारतींना तीन वाढीव एफएसआय मिळावा असा प्रस्ताव संचालक मंडळाच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नसून २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर पुन्हा चर्चा होणार आहे. तीन एफएसआयमध्ये वाशीत जादा घर निर्मिती करण्याचा सिडकोचा विचार आहे. त्यातील काही घरे विकासक आणि मूळ रहिवाशांना वाढीव क्षेत्रफळाची दिली जाणार आहेत. १७ मीटरचे घर असणाऱ्या रहिवाशाला ३० मीटर जादा क्षेत्रफळ मिळणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सांगितले.
नवी मुंबईत एफएसआयचा मुद्दा रंगणार
लोकसंख्या दिवसागणिक झपाटय़ाने वाढणाऱ्या नवी मुंबईतील निकृष्ट इमारतींना अडीच एफएसआय प्राप्त झाल्यास येथील रहिवाशांच्या घरांचा प्रश्न सुटणार आहे.
First published on: 20-02-2014 at 02:40 IST
TOPICSएनएमएमसी (नवी मुंबई महानगरपालिका)NMMCएफएसआयFSIमहाराष्ट्र सरकारMaharashtra GovernmentसिडकोCidco
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmc proposed 2 5 fsi where as cidco demand 3 fsi to maharashtra government