गेल्या काही दिवसांपासून सिंचन घोटाळ्यासंदर्भात अजित पवारांसह अन्य नेते आणि अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप आहेत. परंतु प्राप्तिकर विभागाने ‘महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड’ या कंपनीचे संचालक धीरेंद्र भट यांच्या घरावर मारलेल्या छाप्यानंतर जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये अजित पवार यांच्यासह नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, सुनील देशमुख, विजय वडेट्टीवार आदी अनेकांना टक्केवारीच्या स्वरूपात पैसे पोहचविल्याचे पुरावे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागल्याचा आरोप जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी केला.
‘महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड’ ही बांधकाम क्षेत्रातील मोठी कंत्राटदार कंपनी असून घोडझरी सिंचन प्रकल्प आणि टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचीही कामे याच कंपनीला मिळाली होती. परंतु २३ सप्टेंबर २००९ रोजी प्राप्तिकर खात्याने भट यांच्या घरावर छापा टाकून काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यावेळी मिळालेल्या कागदपत्रामध्ये अनेक व्यक्तींना टक्केवारीच्या स्वरूपात पैसे दिले गेल्याचे आढळले होते.  याप्रकरणात सर्वात जास्त संशय अजित पवार यांच्यावरच होता, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे.
‘पाटकर यांचे आरोप निराधार’
गोसीखुर्द प्रकल्पाच्या ठेकेदाराने आपल्याला लाच दिल्याचा मेधा पाटकर यांनी केलेला आरोप तथ्यहीन आणि निराधार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आरोप केलेल्या ठेकेदाराशी आपला दुरान्वये संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मेधा पाटकर यांनी आपले नाव घेतले असले तरी त्यांनी उल्लेख केलेल्या काळात आपल्याकडे जलसंपदा खातेच नव्हते, असे जलसंपदा खात्याचे माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीही सांगितले.