मुंबईतील खासगी बिल्डरांच्या घरांच्या कोटींच्या किमती परवडत नसल्याने हक्काच्या घरासाठी ‘म्हाडा’च्या सोडतीकडे मुंबईकरांचे लक्ष लागले असले तरी यंदाच्या सोडतीत मोठी घरे नसल्याने उच्च उत्पन्न गटातील इच्छुकांना यंदा म्हाडाचा ठेंगा मिळाला असून त्यांना आता पुढच्या वर्षीच्या सोडतीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘म्हाडा’ने २०१२ मध्ये मुंबईतील ८६७ घरांसाठी सोडत काढली होती. त्यात पवई, बोरिवली पूर्व आणि बोरिवली पश्चिम येथे अशा तीन ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी मोठी घरे होती. पवईत ५५, बोरिवली पश्चिम येथे ६२ तर बोरिवली पूर्व येथे ५५ अशी एकूण ८६७ पैकी १७२ घरे उच्च उत्पन्न गटासाठी होती. ‘म्हाडा’ने २०१२ च्या सोडतीचा निकाल जाहीर करतानाच २०१३ च्या सोडतीत उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश नसण्याचे संकेत दिले होते. सध्या यावर्षीच्या सोडतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा वा जाहिरात आली नसली तरी मागच्या वर्षी संकेत दिल्याप्रमाणे २०१३ च्या सोडतीत मोठय़ा घरांचा समावेश नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यंदा मुंबईत म्हाडाची मागच्या वर्षीपेक्षा अधिक म्हणजे सुमारे एक हजार घरे तुंगा- पवई, मागाठणे, चारकोप येथे उपलब्ध असतील. मात्र यात उत्पन्न गटासाठी घरे नाहीत. केवळ अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट अशा गटांसाठी घरे असल्याने मुंबईत सामान्य नागरिकांना यंदा अधिक संधी आहे. यंदाच्या सोडतीत सर्वाधिक सुमारे ७०० घरे अल्प उत्पन्न गटासाठी, ८४ घरे मध्यम उत्पन्न गटासाठी तर सुमारे सव्वा दोनशे घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता उच्च उत्पन्न गटातील इच्छुकांना आणखी किमान एक वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
घरांची संख्या कमी
‘म्हाडा’च्या २०१३ च्या सोडतीत मुंबईत एक हजार ७८६ घरे उपलब्ध होतील, असा अंदाज ‘म्हाडा’ने २०१२ च्या सोडतीच्या निकालात वर्तवला होता. पण सुधारित अपेक्षेनुसार यंदाच्या सोडतीत एक हजार घरेच उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.