सिडको प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व घरे विनाअट कायम करा, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सिडको नोकरीत सामावून घ्या, साडेबारा टक्के योजनेतील भूखंडाचे वितरण पूर्ण करा, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हजारो प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी सिडको भवनला धडक दिली. सिडको सर्वपक्षीय संघर्ष समितीने आयोजित केलेल्या या आंदोलनाला प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांची उपस्थिती प्रकल्पग्रस्तांना लढण्याचे बळ देणारी ठरली.
नवी मुंबई, उरण, पनवेल, भागातील प्रकल्पगस्तांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. सिडकोच्या वतीने शासन आश्वासन देत आहे, पण त्याची पूर्तता होत नसल्याने प्रकल्पग्रस्त संतापला आहे. या संतापाला पाटील यांनी वाट करून देण्याचे ठरविले असून प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटची निकराची लढाई लढण्याचे ठरविले आहे. त्यासाठी वयाच्या ८८ व्या वर्षी तब्येत साथ देत नसताना पाटील प्रकल्पग्रस्तांसाठी मैदानात उतरले असून, त्यांनी सोमवारी दहा हजारांपेक्षा जास्त प्रकल्पग्रस्तांना संबोधित केले. सिडको आणि शासनाने प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केल्याने आता मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्याखेरीज माघार नाही, असे दिबा यांनी ठणकावले आहे. सर्वपक्षीय संघर्ष समितीने आयोजित केलेल्या या मोर्चात आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन पाटील, नगराध्यक्ष चारुशीला घरत सामील झाल्या होत्या. सिडको मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ या नेत्यांनी ठिय्या मांडला असून तो आज, मंगळवारीही कायम राहणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिबा यांच्याशी संपर्क साधला होता, पण लेखी आश्वसानाखेरीज आपण आंदोलन मागे घेणार नाही, असे दिबा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No back position inspite of cm writing assurance
Show comments