Maratha Kranti Morcha::मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यभरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या बंदमध्ये मुंबई आणि ठाण्याचा समावेश नसणार आहे. यासोबत परळीलाही वगळण्यात आलं आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा समनव्यक समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. याआधी नवी मुंबईत कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यात येणार नाही, असा निर्णय सकल मराठा समाज नवी मुंबई समन्वय समितीने घेतला होता. या चारही ठिकाणी फक्त ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात ९ ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांची आज (बुधवार) सकाळी एक बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीतील निर्णयानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच परळी या चार शहरांना उद्याच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्यानंतर या एकमदताने या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चारही शहरांना बंद मधून वगळण्यात आले असले तरी या शहरांमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा आंदोलन समन्वय समितीने घेतला आहे.
राज्यात गेल्या २१ दिवसांपासून ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागल्याचे दिसून आले. म्हणूनच उद्या ऑगस्ट क्रांती दिनी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मुख्य शहारांबरोबच महत्वाच्या जिह्ल्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, लातूर आणि रायगड आदी ठिकाणी सर्वाधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतयं. उद्याच्या बंद दरम्यान राज्यातील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे असेच म्हणता येईल.
२५ जुलै रोजी काढलेल्या मोर्चाला नवी मुंबईत हिंसक वळण लागले होते, आणि त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा असे होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.