तोटय़ात चाललेल्या बेस्ट व्यवस्थापनाने कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास असमर्थता दाखवल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी सुनीसुनीच जाणार आहे. सद्यस्थितीत बोनस देणे शक्य नाही. कामगार संघटनांनी बेस्ट प्रशासनाला समजून घ्यावे, अशी विनंती बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली. मात्र  कामगार संघटनांनी बेस्टविरुद्ध एल्गार पुकारण्याची तयारी केली आहे. परिणामी मुंबईकरांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा महापौरांनी केल्यानंतर बेस्टच्या ४२ हजार कर्मचाऱ्यांतही बोनसची आशा पालवली होती. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र, ‘बेस्टच्या उत्पन्नातील ९० टक्के रक्कम आस्थापनेवर खर्च होत आहे. इतर आस्थापनांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना १० टक्के अधिक महागाई भत्ता देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना थकबाकीही देण्यात आली आहे. सध्या बेस्टची आर्थिक स्थिती हलाखीची असून बोनस देता येणार नाही. अन्यथा बेस्ट उपक्रम चालविणे अवघड होईल,’ अशी भूमिका महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी मांडली.
..तर ५२ कोटींचा भार पडला असता
पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे या कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये बोनस देण्यात आला असता तर बेस्टच्या तिजोरीवर सुमारे ५२ कोटी ५० लाख रुपयांचा भार पडला असता. सध्याच्या स्थितीत इतका मोठा भार सहन करण्याची बेस्टची ऐपत नाही. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसपासून वंचित राहावे लागणार आहे.

Story img Loader