रिक्षा-टॅक्सींच्या मीटरचे कॅलिब्रेशन करण्याची मुदत उलटून ३ दिवस झाले तरी परिवहन विभागाने रिक्षा-टॅक्सी युनियनशी चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच ठेवले आहे. हकीम समितीच्या शिफारशींनुसार ताबडतोब भाडे वाढविणाऱ्या परिवहन विभागाने मुदतीत कॅलिब्रेशन न करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर मात्र मायेची पाखर घालत संरक्षण देण्याचीच भूमिका घेतली आहे. दुसरीकडे कॅलिब्रेशन न करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या ग्राहक संघटनांकडे मात्र हेच परिवहन खाते साफ दुर्लक्ष करीत आहे. रिक्षा-टॅक्सीच्या मीटरचे कॅलिब्रेशन करण्याच्या मुदतीस वाढ देण्याबाबत संघटनांशी परिवहन विभागाची चर्चा सुरू असतानाच कॅलिब्रेशन न झालेल्या टॅक्सींवर कारवाईही सुरू करण्यात आली आहे. रिक्षा-टॅक्सींचे मीटर कॅलिब्रेशन करण्याबाबत डॉ. हकीम समितीच्या शिफारशीनुसार देण्यात आलेली मुदत २४ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली. मात्र अपेक्षेपेक्षा कमी मीटरचे कॅलिब्रेशन झाल्यामुळे परिवहन विभागाने अधिकृत मुदतवाढ द्यावी अशी रिक्षा – टॅक्सी संघटनांनी परिवहन आयुक्तांकडे मागणी केली असून त्याबाबत सोमवार आणि मंगळवारी परिवहन आयुक्तांशी चर्चाही केली आहे. मॅकेनिकल मीटरच्या रिक्षा आणि टॅक्सीबाबतच समस्या असून मार्चपर्यंत त्यांच्या कॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काही रिक्षा संघटनांनी केल्याचे समजते. दरम्यान, ताडदेव येथील विभागीय परिवहन विभागाने सोमवारी कॅलिब्रेशन न झालेल्या चार
टॅक्सींवर कारवाई केली तर मंगळवारी आणखी १२ टॅक्सी जप्त करण्यात आल्याचे परिवहन विभागाने सांगितले. मात्र त्याच वेळी अंधेरी आणि वडाळा येथे
गेल्या तीन दिवसांत एकाही रिक्षा-टॅक्सीचालकावर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समजते.

Story img Loader