सीबीआय अधिकारी भासवून बॉलिवूड निर्मात्यांसह व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या महाठकांमध्ये सीबीआयचा कुठलाही अधिकारी गुंतलेला नाही, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी उच्च न्यायालयात केला.
विशेष दक्षता विभागाकडून बनावट सीबीआय अधिकारी प्रकरणाची चौकशी केली जात असल्याची माहिती सीबीआयच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. केतन तिरोडकर यांनी यासंदर्भात केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस सीबीआयच्या वतीने या प्रकरणात आपला कुठलाही अधिकारी गुंतलेला नसल्याचे सांगण्यात आले.
याचिकेतील दाव्यानुसार, अश्विन कुमार आणि राजेश रंजन या दोघांनी सीबीआयचे अधिकारी भासवून राकेश रोशन यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेला खटला मागे घेण्याची तयारी दाखवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. परंतु रोशन यांनी याबाबत सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर हे बनावट सीबीआय अधिकाऱ्यांचे प्रकरण उघडकीस आले. तसेच दोघा बनावट सीबीआय अधिकाऱ्यांनी याच पद्धतीने अनेकांना लुटल्याचेही उघड झाले. सीबीआय अधिकाऱ्यांच्या मदतीनेच आरोपींनी ही लूट केल्याचा आरोपही आहे. त्यामुळे प्रकरणाचा विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी याचिकादाराने केली आहे. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीबाबतचा मोहोरबंद अहवाल या वेळी न्यायालयात सादर करण्यात आला. तसेच या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा