उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही सरकारने अद्याप मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत, ही राज्यसरकारची नामुष्की असल्याची स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी  दिली. मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेरे निविदा दरांमध्ये अडकले असून त्याबाबत लवकरच निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगत पवार यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना घरचा आहेर दिला.
नवी मुंबई पालिकेच्या वतीने शहरात विविध २६८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून देशात असे कॅमेरे बसविणारी ही पहिली पालिका आहे. या कॅमेऱ्यांच्या नियंत्रण कक्षाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बेलापूर येथील पोलीस आयुक्तालयात झाले. त्या वेळी पवार यांनी मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेराची सद्यस्थिती मांडली. या वेळी पालकमंत्री गणेश नाईक, महापौर सागर नाईक, खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार संदीप नाईक व नरेंद्र पाटील उपस्थित होते.
मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा अभ्यास करण्यासाठी गृहमंत्र्यांपासून पोलीस उच्च अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण लंडनला जाऊन आले, पण अद्याप त्यात प्रगती नाही. हे कॅमेरे वेळीच न बसविल्यास सरकारला त्याची मोठी किंमत चुकवावी लागले अशी भीतीदेखील पवार यांनी व्यक्त केली. त्याच वेळी कॅमेरे गुन्हे रोखण्यासाठी असून केवळ गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नाहीत, अशा कानपिचक्याही अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या.

Story img Loader