राज्यात दैनंदिन करोना बाधितांचा आकडा वाढत आहे, खास करुन मुंबई महानगर भागात दैनंदिन करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत करोना बाधितांचा वेग हा सर्वात जास्त आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका असेल किंवा मुंबई महानगर भागातील प्रशासकीय व्यवस्थेत चिंतेचे वातावरण पसरले आहे. करोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला तर पुन्हा एकदा आरोग्य सेवेवर मोठा ताण पडणार आहे. यामुळेच टाळेबंदीची – निर्बंधांची वेळ येऊ नये यासाठी आत्ताच सावधगिरीचा इशारा द्यायला सुरुवात झाली आहे.
असं असलं तरी मुंबई महानगरात धावणाऱ्या, मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेबाबत मात्र अजुनही कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. मुंबईत करोना बाधित रुग्ण जरी वाढत असले तरी लोकलबाबतचा निर्णय हा विविध महानगरपालिकांशी संबंधित आहे, तेव्हा याबाबत राज्य सरकारलाच निर्णय घ्यावा लागणार आहे.
“…तर मात्र केंद्राच्या नियमानुसार मुंबईत लॉकडाउन ” ; महापौर किशोरी पेडणेकर यांचा सूचक इशारा!
सध्या मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल मधून दररोज सुमारे ३० लाखापर्यंत तर मध्य रेल्वे मार्गावर ३६ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. याआधी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली होती, लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यावर ही बंधने काढून टाकण्यात आली आहेत. यामुळे पूर्वीच्या सरासरी पेक्षा प्रवासी संख्या जरी कमी असली तरी मुंबईत लोकल प्रवास हा आता नेहमीसारखा गर्दीचा झालेला आहे. तेव्हा अशी ही लोकल सेवा हे एक करोनाच्या प्रचाराचे मुख्य साधन ठरू शकते.
मुंबईत तूर्त टाळेबंदी नाही ! ; पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भूमिका
त्यामुळेच मुंबई शहरातील करोना बांधितांची संख्या लक्षात वाढत असतांना पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, खास करुन लोकल प्रवासाबाबत पुन्हा निर्बंध घालण्याची वेळ येऊ नये यासाठी करोना संबंधित नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. तेव्हा पुढील काही दिवसांत मुंबई शहरातील, मुंबई महानगर भागातील करोना बांधितांच्या संख्येवर लोकल प्रवासाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.