तरुणांच्या उत्साहावरही विरजण; उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर
समीर कर्णुक, लोकसत्ता
मुंबई : गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव, नवरात्रौत्सवात पारंपरिक ढोलताशांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली होती; मात्र यावर्षी करोनाच्या संकटामुळे ढोलताशा पथकांना एकही सुपारी मिळाली नाही. गणेशोत्सवात यावर्षी ढोलताशे वाजणार नसल्याने याच व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक तरुणांवर सध्या आर्थिक संकट घोंघावत आहे.
पूर्वी पुण्यातील गणपती मिरवणूक ढोलताशांमुळे सर्वाच्या आकर्षणाचा विषय ठरत होती. शिस्तबद्ध आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून ढोलताशा पथक मिरवणुकीत सहभागी होत असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसारख्या शहरातदेखील या ढोलताशा पथकांचे आकर्षण वाढले. पारंपरिक ढोलताशा पथकांना विविध सणांमध्ये मोठी मागणी येऊ लागली. अनेक तरुण-तरुणींनी एकत्र येत ढोलताशा पथकांची स्थापना केली. सध्या मुंबई शहरात जवळपास ५०० च्यावर ढोलताशा पथक आहेत.
यातील अनेकजण मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर काहीजण शिक्षण अथवा नोकरी सांभाळून यामध्ये सहभाग घेतात. मात्र यावर्षी ढोलताशा पथकांना एकही सुपारी मिळाली नाही. त्यामुळे अनेक तरुणांवर सध्या आर्थिक संकट आहे. वर्षांच्या सुरुवातीला येणाऱ्या गुढीपाडवा या सणाच्या वेळी मोठय़ा प्रमाणात मिरवणुका निघत असल्याने यावेळी मोठी मागणी असते. मात्र करोनामुळे या सणालादेखील एकही सुपारी ढोलताशा पथकांना मिळाली नाही. त्यानंतरदेखील अनेक सण आले. मात्र सुपारीच मिळणार नसल्याने यावर्षी या पथकांचा सरावदेखील बंद आहे. तर वर्षभरातील सर्वात मोठा सण असलेल्या यंदाच्या गणेशोत्सवातदेखील यावर्षी ढोलताशे वाजणार नसल्याने पथकांमध्ये नाराजी आहे. सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे आगमन महिनाभर आधीच होते. त्यामुळे ढोलताशा पथकांना महिनाभर मोठी मागणी असते. संपूर्ण महिना गणेशोत्सवात हे पथक व्यस्त असतात. यातून चांगली कमाईदेखील होते. मात्र यावर्षी करोनामुळे मिरवणूक निघणार नसल्याने ढोलताशा पथकांना आर्थिकदृष्टय़ाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
आम्ही ढोलताशाचे साहित्य ठेवण्यासाठी जागा भाडय़ाने घेतली आहे. वर्षभरातून मिळणाऱ्या सुपारीतून काही पैसे बाजूला करत आम्ही हे भाडे भरतो; मात्र यावर्षी एकही सुपारी नसल्याने भाडे कसे भरायचे हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे.
-विशाल गवळी, जयमरतड ढोलताशा पथक.