बेताल वक्तव्याबद्दल काकांनी कान उपटल्यानंतर २४ तासांच्या आतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रायश्चित्तासाठी आत्मक्लेष उपोषण सुरू केले आणि शरद पवार यांचे वाद संपविण्याचे आवाहन झुगारून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर नवा हल्ला चढविला. नाटक, स्टंट, नौटंकी अशा शेलक्या शब्दांत अजित पवार यांच्या उपोषणाची खिल्ली उडवत विरोधकांनी पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
दुष्काळामुळे कोरडे पडलेले कालवे, पाणीटंचाई आणि राज्याची लोकसंख्या यांबद्दल काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती पंचाईत झाली होती.   त्यातून उद्भवलेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आणि शनिवारी शरद पवार यांनी अजितदादांच्या वक्तव्याबद्दल जाहीरपणे तीव्र नापसंती व्यक्त केली. अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली असल्याने विरोधकांनी आता वाद संपवावा असे आवाहनही त्यांनी केले, परंतु शरद पवार यांच्या कानपिचक्यांनंतर, आपला पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी रविवारी लगेचच अजित पवार यांनी कराड येथे आत्मक्लेष उपोषण सुरू केल्याने विरोधक पुन्हा आक्रमक झाले.
अजितदादांना खरोखरीच पश्चात्ताप झाला असेल तर त्यांनी मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन दुष्काळग्रस्तांसाठी काम करावे असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनते विनोद तावडे म्हणाले, तर शिवराळ वक्तव्याबद्दल उपोषण नव्हे तर राजीनामाच दिला पाहिजे, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. ‘बूंद से गयी वो हौदसे नही आती’, अशा शब्दांत ठाकरे यांनी  खिल्ली उडविली. आत्मक्लेश उपोषण ही निव्वळ नौटंकी आहे, अशा शब्दांत शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी अजितदादांची खिल्ली उडविली. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनीही अजितदादांच्या राजमीनाम्याची मागणी करीत त्यांच्या आत्मक्लेश उपोषणावर टीका केली.
‘राष्ट्रवादी’कडून समर्थन
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र अजितदादांच्या आत्मक्लेष उपोषणाचे समर्थन केले. अजितदादांना आपली चूक उमगल्याने त्यांनी माफी मागितली आहे. त्यांचे मन मोठे आहे, त्यामुळे अशा वक्तव्यानंतरच्या वेदना त्यांच्या उपोषणातून व्यक्त होत आहेत, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा