महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाहीत, महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. असे वक्तव्य राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात तयार झाला आहे. त्यामुळे देशातील ओबीसी भरडला जाऊ नये यासाठी पंतप्रधान आणि भारत सरकारने लक्ष घालून हा प्रश्न सोडवला पाहिजे. छगन भुजबळ यांनी या या विषयावर नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावं असं आवाहन केलं आहे. हा आता फक्त राज्याचा प्रश्न राहिला नसून आता संपूर्ण देशाचा प्रश्न आहे असं म्हणत त्यांनी आरक्षणाचा विषय भाजपाच्या कोर्टात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावर भाजपाकडून अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत आहेत. ओबीसींचं राजकीय आरक्षण कोणामुळे रद्द झालं यावरून राजकीय धुरळा उडत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. 

  राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे या निर्णयाचा फटका निवडणुकीत आपल्याला बसू नये याची पूर्ण काळजी सर्व राजकीय पक्षांकडून घेतली जात आहे.  नुकतीच ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. भाजपाकडून इम्पिरिकल डेटा सादर करण्याच्या मुद्यावरून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोर्टाने सांगूनसुद्धा अडीच वर्षात तुम्ही साधा इम्पिरीकल डेटा सादर केला नाही असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर विरोधक करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली. या शिष्टमंडळाने आयोगाकडे शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डेटा देण्याची मागणी केली आहे. 

या विषयावर भाजपासुद्धा वेगानं पावलं उचलत आहे. ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाची पुढील भूमिका काय असेल हे ठरवण्यासाठी भाजपानं शनिवारी एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader