मुंबई कुणाची माहीत नाही, पण आता या शहरात जीव रमत नाही, अशी कबुली प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी बदलापूर येथे एका कार्यक्रमात दिली. बदलापूरमधील दुबेबाग येथे शाश्वत फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या ‘सहवास’ निवासगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
‘पुस्तके वाचून अभिनय करता येत नाही. त्यासाठी माणसं वाचावी लागतात आणि वाचण्यासारखी माणसं गावात आहेत, मुंबईत नाहीत. ‘सहवास’चे कुटुंब इतके मोठे व्हावे की इथे आलेल्या आजी-आजोबांना घरची आठवणच यायला नको. उलट त्यांच्या मुलांनाच इथे यावेसे वाटेल, असे छान काम करा, असेही त्यांनी भाषणाच्या ओघात सांगितले. सहवास प्रकल्पासाठी भरीव देणगी देणाऱ्या लिमयेआजींचा नाना पाटेकर यांनी व्यासपीठावरून खाली येऊन सत्कार केला. किती दिले यापेक्षा समाजासाठी काहीतरी देण्याची जाणीव महत्त्वाची आहे. अनेक जण प्रसिद्धीपासून दूर राहून खरीखुरी समाजसेवा करतात. त्यामुळेच समाजातील चांगुलपणा अद्याप टिकून आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष किसन कथोरे, अ‍ॅड. चंद्रशेखर भिडे, अशोक हातोळकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.