ठाणे पालिकेच्या आयुक्तपदी असताना राज्याच्या पर्यावरण खात्याचे विद्यमान प्रधान सचिव आर. ए. राजीव यांनी अधिकारांचा गैरवापर करून ठाणेकरांच्या पैशांचा अपव्यय केल्याच्या आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) स्पष्ट केले आहे.
सरनाईक यांनी राजीव यांच्याविरुद्ध केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जयराज छाप्रिया यांच्या वतीने महाधिवक्ता दरायस खंबाटा यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात राजीव यांच्याविरुद्धच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यात आली असता त्यांच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल केला जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. ठाणे पालिका आयुक्त कार्यालयातून उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतून राजीव यांनी कुठलाही गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी तरी सिद्ध होऊ शकलेले नाही, असा दावाही प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. राजीव यांच्यावरील आरोपांप्रकरणी चौकशी करण्याबाबत सरनाईक यांनी राज्याच्या नगरविकास खात्याकडेही पत्रव्यवहार केला होता व त्यांच्याकडूनही आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीत काय निष्पन्न होते याची आपल्याला सूचना द्यावी, अशी विनंती आपण नगरविकास खात्याकडे केली असल्याची माहिती एसीबीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने सरनाईक यांना या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे आदेश देत सुनावणी १७ सप्टेंबपर्यंत तहकूब केली.
ठाणे पालिका कार्यालयाच्या चौथ्या मजल्याचे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली राजीव यांनी आयुक्त म्हणून असलेल्या अधिकारांचा गैरवापर करून पैशांचा अपव्यय केल्याचा आरोप सरनाईक यांनी याचिकेद्वारे केला आहे. या सुशोभीकरणासाठी ६५ लाख रुपयांचा खर्च झाला होता आणि तो बांधकाम व्यावसायिकांच्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग’ने केला होता. तसेच हे पैसे राजीव यांच्या हडपल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.