मुंबई महानगरपालिकेकडूनही परिपत्रक जारी
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र तयारीची लगबग शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोस्तव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मुंबईकर आपापल्या मूळ गावी जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील धार्मिक सण व उत्सवांच्या कालावधीत परीक्षांचे नियोजन करू नये, अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी शाळांना दिल्या आहेत.
हेही वाचा >>> वायआरएफच्या भजन कुमारचा चेहरा आला समोर…
विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही धार्मिक सण व उत्सवांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या कोणत्याही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेऊ नयेत अशी सूचना सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त अनुदानित – विनाअनुदानित व इतर बोर्डाच्या शाळांना दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांच्या लेखी, तोंडी अथवा प्रात्यक्षिक आदी कोणत्याही प्रकारच्या परीक्षा न घेण्यासाठी आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्र दिले होते.