‘‘न्यायालयाने दिलेल्या मुदतीत शरण जाऊन मी शिक्षा भोगणार आहे. मी कायद्याचा आदर करतो. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आहे. त्यामुळे माझी हात जोडून एकच प्रार्थना आहे, मला शांततेत राहू द्या’’.. १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी म्हणून उर्वरित शिक्षा भोगण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेता संजय दत्तला अश्रू अनावर झाले आणि आपल्या खासदार बहिणीच्या खांद्यावर डोके ठेवून तो हमसाहमशी रडला. बहिणीच्या सांत्वनाचे हात पाठीवर फिरले आणि संजय दत्तने मोठय़ा कष्टाने स्वत:ला सावरले.
पाच वर्षांच्या शिक्षेतील उर्वरित साडेतीन वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात दाखल होण्यासाठी न्यायालयाने दिलेली मुदत संपण्यापूर्वी अनेक कामे संजय दत्तला हातावेगळी करावयाची आहेत. गुरुवारी वांद्रे येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय दत्तच्या चेहऱ्यावर हीच चिंता उमटलेली होती. हाती असलेला थोडासा वेळ कुटुंबासोबतही घालवायचा आहे. माझ्या आयुष्यातील खडतर काळात ज्यांनी मला आधार दिला, त्या सर्वाचा मी आभारी आहे, असे सांगताना पुन्हा त्याचे शब्द गदगदले. मी दयेसाठी विनंती करणार नसल्याने त्यावर चर्चा नको, अशी विनंती करून संजय दत्त शूटिंगसाठी बाहेर पडला. सुमारे २० वर्षांपूर्वी, १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत २५७ निरपराधांचे प्राण गेले होते. या खटल्याच्या निकालात गेल्या २१ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला बेकायदा शस्त्र बाळगल्याबद्दल पाच वर्षांची शिक्षा सुनावली. यापैकी अठरा महिन्यांचा तुरुंगवास त्याने अगोदरच भोगलेला असल्याने उर्वरित साडेतीन वर्षे संजयला तुरुंगात राहावे लागणार आहे.
संजय दत्तची शिक्षा माफ व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक प्रतिष्ठितांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. न्या. काटजू यांनी तर त्यासाठी न्यायालयात जायचे ठरविले आहे. अभिनेत्री खासदार जयाप्रदा व अमरसिंह यांनी तर राज्यपालांची भेट घेऊन संजयची शिक्षा माफ करण्याची मागणी केली. दुसरीकडे संजयच्या शिक्षामाफीच्या मागणीला विरोधही वाढत असून सेलिब्रिटींना वेगळा न्याय नको, अशी भूमिकाही मूळ धरत आहे.
मी दयेची विनंती केलेली नाही, उलट इतर अनेक जण माफीला पात्र आहेत. मी माझी शिक्षा भोगणार आहे.
– संजय दत्त